मुदतठेव न भरणाऱ्या महाविद्यालयांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून काढून टाकण्याचा निर्णय तंत्रशिक्षण विभागाने घेतल्यानंतर आता ठेवी भरण्यासाठी शिक्षणसंस्थांची पळापळ सुरू झाली आहेत. व्यवस्थापन, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या जवळपास पन्नास महाविद्यालयांची यादी तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केली होती.
अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र आणि वास्तुनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांना प्रत्येक अभ्यासक्रमासाठी काही रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवावी लागते. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि राज्याचा तंत्रशिक्षण विभाग यांच्या नियमाप्रमाणे ठेवी ठेवाव्या लागतात. मात्र, अनेक संस्था दाखवण्यापुरत्या ठेवी ठेवून त्या नंतर मोडत असल्याचे समोर आल्यामुळे या संस्थांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून काढून टाकण्याचा निर्णय तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी ठेवींची रक्कम भरणाऱ्या संस्थांना प्रवेश प्रक्रियेत सामावून घेण्यात येणार आहे.
आवश्यक तेवढी रक्कम ठेव म्हणून न ठेवणाऱ्या महाविद्यालयांची यादी तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केली होती. पुणे विभागातील जवळपास पन्नास महाविद्यालयांची यादी विभागाने जाहीर केली होती. त्यामध्ये पुणे जिल्ह्य़ातील व्यवस्थापन अभ्यासक्रमाची ३० महाविद्यालये, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची ९ महाविद्यालये, वास्तुनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची १२ आणि औषधनिर्माण शास्त्राच्या २ महाविद्यालयांचा समावेश होता. मुदतठेवींच्या रकमा भरण्यासाठी आता या महाविद्यालयांची पळापळ सुरू झाली आहे. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयाला किमान ५ लाख रुपये गुंतवावे लागतात. त्यामुळे अनेक तंत्रशिक्षण महाविद्यालये असणाऱ्या संस्था अडचणीत आल्या आहेत. यातील काही संस्थांच्या मुदत ठेवींची रक्कम ही कोटी रूपयांच्या घरात जाते. त्यामुळे या शिक्षणसंस्थांची गडबड उडाली आहे. ‘जिल्ह्य़ातील बहुतेक शिक्षणसंस्थांनी आपल्या मुदत ठेवी जमा केल्या आहेत. मात्र, मोठय़ा संस्थांना प्रत्येक महाविद्यालय आणि अभ्यासक्रमानुसार रकमा जमा कराव्या लागत आहेत. मात्र, यामुळे प्रवेश क्षमतेत फार फरक पडणार नसल्याचे तंत्रशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.