सेवा ज्येष्ठतेचे निकष पूर्ण केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी खात्यांतर्गत परीक्षा दिल्यानंतर ते फौजदार पदासाठी पात्र ठरले खरे आणि त्यांना बढतीसुद्धा मिळाली. प्रशिक्षण देऊन प्रत्येकाला ‘सव्र्हिस रिव्हॉल्व्हर’ ही देण्यात आले. मात्र, इतके होऊनही सुमारे शंभराहून अधिक गेल्या चार महिन्यांपासून हवालदाराचाच पगार घेत आहेत.. कारण त्यांना अद्याप नियुक्तीचे पोलीस ठाणे मिळालेले नसल्यामुळे पहिल्या ठिकाणी काम करत आहेत.
पोलीस खात्यामध्ये सेवा ज्येष्ठतेचे निकष पूर्ण केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी खात्यांतर्गत फौजदाराची परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेण्यात आली. पुणे विभागातून तीन हजार पोलीस कर्मचाऱ्यांनी ही परीक्षा दिली. पुणे विभागाची कोल्हापूर येथे तीन दिवस परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात लागला. या परीक्षेत पुणे शहर, ग्रामीण, राज्य गुन्हे अन्वेषण शाखा आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील एकशे दहा कर्मचारी फौजदार पदासाठी पात्र ठरले. त्यापैकी शंभर जणांना पुणे शहरात फौजदार म्हणून नियुक्ती मिळाली तर दहा जणांची औरंगाबाद परिक्षेत्रात नियुक्ती करण्यात आली. शंभर पोलीस कर्मचाऱ्यांना फौजदार म्हणून बढती मिळालेली आहे. मात्र, त्यांना फौजदाराचा पगार मात्र अद्याप मिळालेला नाही.
शहरातील ९४ पोलीस कर्मचारी आणि पुणे ग्रामीण, सीआयडी आणि एसीबीचे सात कर्मचारी यांना फौजदार म्हणून बढती मिळाल्यानंतर त्यांची नियुक्ती पुणे शहर येथे करण्यात आली आहे. मात्र, ते सध्या पूर्वी असलेल्या ठिकाणीच आणि पूर्वीचेच काम करत आहेत. या सर्वाना पोलीस मुख्यालयात फौजदाराचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना सवर्ि्हस रिल्व्हॉल्व्हर सुद्धा मिळाले. या प्रक्रियेनंतर सर्व नवीन फौजदारांकडून क्रमाने त्यांच्या आवडीच्या तीन पोलीस ठाण्यांची माहिती घेण्यात आली आहे. मात्र, त्यांना अद्याप कोणतेही पोलीस ठाणे मिळालेले नाही. त्यांच्या नियुक्त्यांची फाईल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टेबलावर पडून आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या शंभर पोलीस फौजदारांना पोलीस ठाण्याचे वाटप करण्यास वेळच मिळालेला नाही. फौजदार झाले पण अधिकारी म्हणून काम करण्याची अद्याप संधीच मिळत नसल्यामुळे फौजदारांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. या दफ्तर दिरंगाईचा फटका शंभर नवीन पोलीस फौजदारांना बसला आहे. यावर लवकर निर्णय घेण्याची मागणी त्यांच्याकडून होत आहे.