डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागे असणारी मानसिकता, आजच्या पुरोगामी चळवळींची झालेली अवस्था आणि सदसद्विवेकबुद्धीच्या स्वातंत्र्याची गरज या गोष्टींवर मते व्यक्त झाली आणि प्रत्येकाने आपली विचारशक्ती जागृत ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. शिवप्रेमी जनजागरण समिती आणि शिवराज्य पक्षाच्या वतीने ‘संत तुकाराम ते डॉ. दाभोलकर- दहशतवादाचा अस्सल चेहरा’ या विचारावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, माजी विशेष पोलिस महासंचालक सुरेश खोपडे, माजी पोलिस महानिरीक्षक श. म. मुश्रिफ, प्रा. प्रतिमा परदेशी, शिवराज्य पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत या वेळी उपस्थित होते.
‘आपला विकत गेलेला मेंदू परत मिळवण्यासाठी सखोल वाचनच आधार ठरू शकेल,’ असे मत कोळसे- पाटील यांनी व्यक्त केले. खोपडे म्हणाले, ‘‘आजच्या पुरोगामी चळवळींची धोरणे कालबाह्य़ ठरत नाही ना, हे तपासून पाहणे आवश्यक आहे. या चळवळींची अवस्था हत्ती आणि पाच आंधळ्यांच्या गोष्टीसारखी झाली आहे. चळवळींनी हाती घेतलेल्या प्रश्नांच्या मुळापर्यंत पोहोचणे आणि त्याच्या प्रत्येक पैलूचा र्सवकश विचार होणे आवश्यक आहे.’’ विकृत विचारसरणीविरोधात ठामपणे उभे राहण्याची गरज मुश्रिफ यांनी बोलून दाखवली. वारे म्हणाले, ‘‘फॅसिस्ट प्रवृत्ती वाढू न देण्याचा निर्धार समाजाने करायला हवा. सांस्कृतिक परंपरांमध्ये मिसळण्यात आलेली धर्माची दुकानदारी दूर करणे आवश्यक आहे.’’