राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (सीएसआयआर-एनसीएल), पुणे यांनी कोविड-19 च्या रुग्णांच्या आणि संशयितांच्या नाक आणि घशातील स्राव संकलनासाठी स्वदेशी साधन (nasopharyngeal swabs-एनपी स्वॅब) बनवले आहेत. कोविड-19 च्या साथीच्या सध्यस्थितीत, एनपी स्वॅब्सचे जागतिक पुरवठादार वेळेवर प्रमाणात पुरवठा आणि किंमत या दोन्ही बाबतीत विश्वासार्ह नाहीत. त्यामुळे स्वदेशी एनपी स्वॅब्स विकसित करण्याची गरज सीएसआयआरने एप्रिलच्या मध्यात ओळखली आणि सीएसआयआर-एनसीएलने ही जबाबदारी स्वीकारली.

एक वैद्यकीय साधन म्हणून रासायनिक रचना, संरचनात्मक आणि जैविक अनुकूलता यासंदर्भातील काही विशिष्ट वैशिष्ट्ये पूर्ण करणे अत्यंत गरजेचे ठरते. यामध्ये अ‍ॅल्युमिनियम किंवा प्लास्टिकपासून बनवलेली एक दांडी आणि टोकावर कृत्रिम धाग्यांचा संचय केला आहे. कृत्रिम धाग्यांचे संचयन हा यातील महत्वाचा घटक असून यात धागे दांड्याच्या टोकावर दातांच्या ब्रशप्रमाणे समांतर परंतु गोल गुंडाळलेले आहेत. याचा व्यास हा एक मायक्रॉन एवढा आहे. डॉ. चंद्रशेखर रोडे, डॉ. प्रकाश वडगावकर आणि डॉ. अनुया निसाळ या सीएसआयआर-एनसीएलच्या वैज्ञानिक पथकाने एनपी स्वॅबच्या विस्तृत तपशीलांवर यशस्वीरित्या काम केले.

या एनपी- स्वॅबचे वैशिष्ट्य असे की याच्या डिझाइन, उत्पादन, पॅकेजिंग आणि निर्जंतुकीकरण इत्यादींसाठी वैद्यकीय श्रेणीची सामग्री वापरणे सर्वात महत्वाचे आहे. सीएसआयआर-एनसीएलचे संचालक डॉ. अश्विनीकुमार नांगिया यांनी सांगितले की, “अगदी थोड्या काळामध्ये तातडीने आवश्यक असलेल्या वैद्यकीय स्वॅब उत्पादनासाठी पोलिमर्सच्या वैशिष्ट्यांचे आणि रासायनिक विश्लेषणाचे अनुकूलन करण्याचे हे उत्तम उदाहरण आहे”.

सीएसआयआर-एनसीएलने नमुने संकलनासाठी स्वदेशी एनपी स्वॅबची प्रक्रिया सीएसआयआरच्या कोविड-19 तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या सीएसआयआरच्या मार्गनिर्देशनांतर्गत मुंबईतील रसायन कंपनीला हस्तांतरित केली आहे. एनपी स्वॅब्स, त्यांचे व्यास, टोकाची संरचना आणि निर्जंतुकीकरण पद्धतीची योग्य रसायनिक आणि पॉलिमर रचनेची पुष्टी केल्यानंतर एनसीएलने कंपनीला वैद्यकीय उपकरणांच्या मंजुरीसाठी पुढील नियामक मार्ग सुचविला आहे. ते दररोज 1 लाख एनपी स्वॅब्स तयार करण्यास सक्षम आहेत.