पुणे शहरापासून जवळ असलेल्या कोंढवा गावाचे रुप गेल्या काही वर्षांत पूर्णत: पालटले असून एकेकाळी शहरापासून लांब वाटणारे हे गाव आता पुणे शहराचा एक भाग म्हणून ओळखले जात आहे. गावठाण म्हणून ओळख असलेला पूर्वीचा कोंढवा भाग शहरातील उच्चभ्रूंचा तसेच बहुभाषिक वस्तीचा भाग म्हणून ओळखला जात आहे. वेगाने विकसित होत गेलेल्या या भागात परप्रांतीय तसेच शहरात शिक्षणासाठी आलेले परदेशी विद्यार्थी मोठय़ा संख्येने वास्तव्यास आहेत.

पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी कोंढवा गावाचे खुर्द आणि बुद्रुक असे दोन भाग होते. कोंढवा, उंड्री, पिसोळी, महंमदवाडी हा भाग शहरापासून जवळ असलेला गावांचा भाग म्हणून ओळखला जात होता. या भागातील स्थानिक रहिवासी एकमेकांची विचारपूस करताना खालच्या का वरच्या कोंढव्यातील, अशी विचारणा करत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या भागाचा वेगाने विकास झाला. पाहता-पाहता बैठय़ा घरांचे कोंढवा गावठाण तसेच परिसराचे रुप  बदलून गेले.

येथील एनआयबीएम रस्ता, लुल्लानगर भागात उच्चभ्रूंचे वास्तव्य आहे. तसेच या भागात मोठय़ा संख्येने परदेशातून शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी स्थायिक झाले आहेत.

गगनचुंबी इमारती या भागात उभ्या राहिल्या असून अगदी पुरंदर तालुक्यातील सासवडच्या दिशेने जाणाऱ्या बोपदेव घाटाच्या पायथ्यापर्यंत गृहप्रकल्पांची कामे सध्या वेगाने सुरू आहेत. कोंढव्याजवळ असलेल्या खडी मशीन चौक, येवलेवाडी या भागात लोकवस्ती वाढत आहे.

नियमांकडे दुर्लक्ष : कोंढवा भागाचा विकास होताना टोलेजंग इमारती वेगाने उभ्या राहिल्या असून त्यातील अनेक इमारती उभ्या करताना महापालिकेच्या बांधकाम नियमावलीकडे दुर्लक्ष झाल्याचे प्रकार घडले आहेत. त्याबरोबरच गुंठवारीचीही हजारो बांधकामे येथे उभी राहिली आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत अनेकदा चर्चा झाली आहे. मात्र त्यानंतरही ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत.