News Flash

रुग्णालयातून होणारा संसर्ग टाळण्यासाठी सूक्ष्मजीवरोधी आवरण विकसित

‘सिम्बायोसिस’मधील वैज्ञानिकांचे संशोधन

प्रतिकात्मक फोटो

करोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना रुग्णालयांतून होणाऱ्या जीवाणू आणि विषाणू संसर्गापासून बचाव करण्यासाठी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या संशोधकांनी सूक्ष्मजीवरोधक आवरण तयार केले आहे. या आवरणाच्या मदतीने कोविड-१९ या करोना विषाणूचा रुग्णालयांमधून होणारा संसर्ग टाळण्यास मदत होऊ शकणार आहे.

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार न्यूयॉर्कमध्ये झालेल्या दहा हजार करोना मृत्यूंपैकी जवळपास साडेतीन हजार मृत्यू हे शुश्रुषा गृहातील कोविड-१९ संसर्गामुळे झाले होते. यातूनच रुग्णालयांमधून होणारा करोना संसर्ग टाळणे महत्त्वाचे आहे हे स्पष्ट होते. नेमका हाच उद्देश या संशोधनातून साध्य होणार आहे.

सिम्बायोसिस सेंटर फॉर नॅनोसायन्स अँड नॅनोटेक्नॉलॉजी आणि सिम्बायोसिस स्कूल ऑफ बायॉलॉजिकल सायन्सेस यांनी प्रयोगशाळेत तयार केलेल्या, वेगळे गुणधर्म असलेल्या संयुगाचा वापर सूक्ष्मजीवरोधी आवरण विकसित करण्यासाठी केला आहे. एससीएनएन सिम्बायोसिस सेंटर फॉर नॅनोसायन्स अँड नॅनोटेक्नालॉजी या संस्थेने तयार केलेल्या या आवरणामुळे सौम्य लक्षणे दाखवणाऱ्या फ्ल्यूसाठी कारणीभूत ठरणाऱ्या न्यूकासल विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या विषाणूमुळे माणसांमध्ये डोळे येण्याचा विकारही निर्माण होत असतो. सूक्ष्मजीवरोधक आवरणामुळे हे न्यूकासल विषाणू रोखले जातात. लिस्टिरिया मोनोसायटोजीन्स या जीवाणूंना रोखण्यातही हे आवरण यशस्वी ठरले आहे, रुग्णालयांमध्ये होणाऱ्या संसर्गात लिस्टिरियाचा मोठा वाटा असतो. कोविड-१९ रुग्णांच्या जवळ जाऊन काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडे असलेल्या वैद्यकीय साधनांना या द्रव सूक्ष्मजीवरोधकाचे आवरण चढवल्यास त्या साधनातून सूक्ष्मजीवांचा संसर्ग पसरण्याची शक्यता कमी होऊ शकते.

सूक्ष्मजीवरोधक द्रव आवरण तयार करण्याची प्रा. अतुल कुलकर्णी यांनी मांडलेली मूळ संकल्पना संशोधन सहायक प्रेम पांडे यांनी पूजा देशपांडे, अनिल थोरमोटे, डॉ. मंदार शिरोळकर, डॉ. योगेश पाटील, डॉ. अमित कुमार तिवारी यांच्या मदतीने प्रत्यक्षात आणली. या संशोधनावेळी करण्यात आलेल्या प्रयोगात मायक्रोकॉकस ल्युटल, लिस्टिरिया मोनोसायटोजिन्स, अ‍ॅसिनोबॅक्टर बाउमॅनी, स्युजोमोनस ऑरगिनोसा, प्रोटियस मिराबिलिस, इ. कोलाय, क्लेबिसिलिया न्यूमोनिया या सूक्ष्मजीवांच्या संसर्गावर या संरक्षक आवरणाने मात केली.

सिम्बायोसिस आरोग्य विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. राजीव येरवडेकर या संशोधनाविषयी म्हणाले की, रुग्णालयातून होणाऱ्या संसर्गामुळे विषाणू आणि जीवाणूजन्य रोग पुन्हा पुन्हा डोके वर काढू शकतात. त्यामुळे हा संसर्ग टाळण्यासाठी सूक्ष्मजीवविरोधी आवरण तयार करण्याचे हे संशोधन महत्त्वाचे आहे. या संशोधनामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संरक्षण कवच उपलब्ध होणार आहे. रुग्णांपासून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना होणारा संसर्ग रोखता येणार आहे. रुग्णालयातून होणारा करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या संशोधनाच्या चाचण्या करण्याचा प्रस्ताव आम्ही सरकारला देत आहोत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कोविड-१९ या विषाणूचा रुग्णालयातून होणारा प्रसार कमी होण्यास मदत होऊ शकेल. या संशोधनाचे बौद्धिक संपदा हक्क मिळवण्यासाठी भारतीय पेटंट कार्यालयाकडे अर्ज करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 4:50 pm

Web Title: develops antimicrobial coating to prevent hospital infection msr 87
Next Stories
1 आमच्यावर व समाजावर उपकार करा, बाहेर फिरू नका; पोलिसाने जोडले हात
2 Coronavirus : पुण्यातील हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेत सर्वाधिक 171 बाधित रुग्ण
3 Coronavirus  : पुण्यात चार, पिंपरीत एका रुग्णाचा मृत्यू
Just Now!
X