राजकीय जीवनात महापौर आणि नगरसेवक होणं खूप कठीण असतं. प्रत्येक गोष्टीसाठी या दोघांनाच जबाबदार धरलं जातं. मी देखील महापौर आणि नगरसेवक ही दोन्ही पदं भुषवली आहेत. ज्यांनी मागच्या जन्मी पाप केलं तो नगरसेवक होतं आणि जो महापाप करतो तो महापौर होतो असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी करताच एकच हशा पिकला. महापौर मुरलीधर मोहळ नागरी सत्कार समिती कोथरुडच्या वतीने पुणे महापालिकेच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड झाली. त्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.

या कार्यक्रमात मोहोळ यांचा माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार गिरीश बापट, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, शिवसेनेचे माजी मंत्री शशीकांत सुतार, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकात मोकाटे, काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रमेश बागवे, मनसेचे नेते बाबू वागसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी महापौर असताना, त्यावेळी एक वर्षाचा कार्यकाळ होता. तेव्हा सुरूवातीचे सहा महिने सत्कार समारंभ आणि तेथून पुढील सभागृह समजण्यात जायची. तोवर दुसर्‍या महापौर निवडीची वेळ येत असत. पण आता महापौर पदासाठी देखील ठरविक कार्यकाळ मिळाला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ निश्चित चांगलं काम त्यांच्या कार्यकाळात करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.