‘चापेकरांच्या नावाचे संग्रहालय हे पिंपरी पालिकेचे सर्वात मोठे काम’

क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मरणार्थ उभारल्या जाणाऱ्या राष्ट्रीय संग्रहालयातून क्रांतिकारकांच्या स्मृती जतन केल्या जातील आणि त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवड येथे व्यक्त केला. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचल्याशिवाय सुराज्य निर्माण होणार नाही, असेही ते म्हणाले.

पिंपरी पालिका व चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मरणार्थ चिंचवड येथे उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संग्रहालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेते एकनाथ पवार, स्मारक समितीचे प्रमुख गिरीश प्रभुणे, कार्यवाह अ‍ॅड. सतीश गोरडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, चापेकरांनी क्रांतीची ज्योत पेटवली, त्यातून पुढे स्वातंत्र्याची बीजे रोवली गेली. अशा क्रांतिकारकांची आठवण या संग्रहालयात जतन करून ठेवली जाणार आहे, त्यापासून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल. क्रांतिकारकांच्या बलिदानाचे मोल समाजाला समजले पाहिजे. समाजाने इतिहास विसरता कामा नये. स्वार्थासाठी जीवन जगणारे अनेकजण असतात. भारत मातेसाठी जगायचे, अशा मानसिकतेतून चापेकरांसारखे अनेक स्वातंत्र्यसेनानी लढले. स्वातंत्र्याचे मोल नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. पालिकेने अनेक मोठी कामे केली असतील. मात्र, चापेकरांच्या नावाचे राष्ट्रीय संग्रहालय त्यापैकी सर्वात मोठे काम असल्याची टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी केली.

प्रास्ताविक एकनाथ पवार व गिरीश प्रभुणे यांनी केले. सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आभार मानले.

‘१२ कोटी जनता हीच विठोबा-रखमाई’

आषाढी एकादशीनिमित्त होणारी मुख्यमंत्र्यांची पंढरपूर वारी रद्द झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना शासकीय पूजा करता आली नाही, या विषयी मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या. आषाढी एकादशीच्या दिवशी आपण पांडुरंगाला स्मरतो. महाराष्ट्रातील १२ कोटी जनता हीच आपल्या दृष्टीने ‘विठोबा-रखमाई’ आहे, त्यांचे दर्शन घेण्याचा योग या कार्यक्रमाच्या निमित्ताने आला, त्यामुळे आपल्या दृष्टीने हा दिवस भाग्याचा आहे, असे ते म्हणाले.