पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून होणार असलेला महानगराचा विकास आणि पुणे शहराची ‘स्मार्ट सिटी’ अभियानासाठी झालेली निवड, यामुळे पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या दृष्टीने बांधकाम क्षेत्राला जाणवत असलेल्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर एका खास परिषदेचे आयोजन ‘लोकसत्ता’तर्फे रविवारी (२९ मे) पुण्यात करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती या परिषदेत असेल.
‘फिनोलेक्स पाइप्स’ प्रेझेंट्स ‘लोकसत्ता रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह २०१६’ पॉवर्ड बाय बी. यू. भंडारी आणि बँक ऑफ महाराष्ट्र या खास परिषदेचा मुख्य विषय ‘पुण्यातील रिअल इस्टेट : वाटचाल भविष्याकडे’ हा आहे. या परिषदेत बांधकाम क्षेत्रातील प्रथितयश व्यावसायिक, तज्ज्ञ आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सहभागी होणार आहेत. ही परिषद फक्त निमंत्रितांसाठी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असलेल्या या परिषदेत पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) मेट्रोपोलिटियन कमिशनर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे, पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार, पिंपरी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे हेही उपस्थित राहणार आहेत. पुणे शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी कोणत्या योजना राबवाव्यात, या संबंधीची चर्चाही ‘लोकसत्ता रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह २०१६’मध्ये होणार असून या क्षेत्रातील व्यावासायिकांच्या समस्या व त्यावरील उपायांबाबत उपस्थितांना मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चेची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुख्य भाषणानंतर उपस्थित निमंत्रितांबरोबर प्रश्नोत्तरांचाही कार्यक्रम परिषदेत होणार आहे.
शहराच्या विकासासाठी अनेक बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, तज्ज्ञ तसेच विविध क्षेत्रातील ख्यातनाम संस्था योगदानासाठी तयार आहेत. त्यांची मते राज्यकर्त्यांनी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणून घ्यावीत, त्यांचे प्रश्न समजून घ्यावेत, त्यांच्याशी चर्चा करावी आणि शहराच्या विकासाचे एक निश्चित धोरण तयार व्हावे, हा ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित परिषदेचा मुख्य हेतू आहे.