बारामतीमध्ये शुक्रवारी कार्यक्रम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये कमळ फुलविण्याचा जाहीर निर्धार बोलून दाखविल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी (१५ फेब्रुवारी) बारामती दौऱ्यावर येणार असून, पवार यांच्या समवेत ते एकाच व्यासपीठावर असणार आहेत. या कार्यक्रमाबाबत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह मतदारसंघामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

केंद्र शासनाची राष्ट्रीय वयोश्री योजना बारामती लोकसभा मतदार संघात प्रभावीपणे राबविल्यामुळे देशभरात हा मतदार संघ अव्वल ठरला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्या उपस्थितीत बारामतीत कार्यक्रम होणार आहे. पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेही मुख्यमंत्र्यांसमवेत व्यासपीठावर असणार आहेत. खासदार सुळे यांनी या कार्यक्रमाबाबत रविवारी जेजुरीतील एका सभेत माहिती दिली.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी  नुकताच बारामती, शिरूर आणि पुणे लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी बारामती लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार जाहीर केला होता. त्यावरून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस-भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एकमेकांना उत्तर देण्याची स्पर्धा लागली आहे. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस स्वत: बारामतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.