सार्वजनिक गणेशोत्सव आणि पुणे यांचं एक अनोखं नातं आहे. या सार्वजनिक उत्सवाला सुरुवात झाली ती पुण्यातूनच. यावर्षी गणेशोत्सवावर सावट आहे ते करोनाचं. करोना संकटाचं सावट लक्षात घेऊन पुण्यातल्या भाऊ रंगारी गणपती मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार यावर्षी गणेशोत्सवात भाऊ रंगारी सार्वजनिक गणपती मंडळाच्या गपणतीचे दर्शन हे फक्त ऑनलाइन असणार आहे. उत्सव प्रमुख पुनित बालन यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कालच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुणे यांनी उत्सव साधेपणाने आणि मंदिरातच साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता भाऊ रंगारी मंडळानेही मंडपात भाविकांना प्रवेश न देता ऑनलाइन दर्शन असेल असे स्पष्ट केले आहे.

यावेळी पुनीत बालन म्हणाले की, आजवर प्रत्येक वर्षी आपण सर्वानी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा केला गेला आहे. मात्र यंदाच्या वर्षी आपण प्रथमच गणेश उत्सवासह इतर सण साध्या पद्धतीने साजरे करीत आहोत. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवामध्ये भाविकांना घरबसल्या सांस्कृतिक मेजवानीचा लाभ घेता येणार आहे. त्यामध्ये सुप्रसिद्ध गायक, संगीतकार शंकर महादेवन यांची वैविध्यपूर्ण संगीत मैफल अनुभवता येणार आहे.

शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या खास गायकीचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. आंतराष्ट्रीय किर्तीचे तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे, बासरीच्या मंजूळ स्वरांनी रसिकांना मोहित करणारे प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांची जुगलबंदी अविस्मरणीय ठरणार आहे. याशिवाय सुप्रसिद्ध गायक, संगीतकार डॉ. सलिल कुलकर्णी यांची सुगम आणि मेलडियस गाण्यांची श्रवणीय मैफल रंगणार आहे. सुप्रसिद्ध लोककलावंत नंदेश उमप आणि गणेश चंदनशिवे हे या सांस्कृतिक महोत्सवात लोककलेचे, लोकगीतांचे विविध रंग उलगडणार आहेत.

‘लिटिल चॅम्प’ फेम युवा गायक प्रथमेश लघाटे, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन आणि स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचा नातू विराज जोशी यांची सुरेल मैफल गणेशभक्तांची मने जिंकणारी ठरेल. तसेच महोत्सवामध्ये पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ, सह-पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे आणि सुप्रसिद्ध संगीतकार अजय आणि अतुल यांच्या मुलाखतीमधून गणेशोत्सव उलगडणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमांचे निवेदन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, श्रुती मराठे, भार्गवी चिरमुले, मिलिंद कुलकर्णी आणि विनोद सातव करणार आहेत. या सांस्कृतिक महोत्सवाचे ऑनलाइन प्रसारण २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२० दरम्यान श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट च्या http://www.shrimantbhausahebrangariganpati.com या अधिकृत संकेतस्थळावर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन मंडपाच्या ठिकाणी करणार

करोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आपण घरगुती गणपती घरीच आणि मंडळानी त्याच ठिकाणी मूर्तीचे विसर्जन करावे. त्यातून प्रशासनाला सहकार्य करावे. त्यानुसार आम्ही देखील बापाच्या मूर्तीचे मंडपाच्या ठिकाणी विसर्जन करणार असल्याचे पुनीत बालन यांनी सांगितले.