शहराच्या विविध भागात मागील काही दिवसांपासून सोसायटय़ांच्या पार्किंगमध्ये वाहनांना आगी लावण्याच्या घटना घडत असून, त्यातील अनेक प्रकार सोसायटीतील किरकोळ वाद किंवा मद्यपींकडून करण्यात येत असल्याचेही समोर येत आहे. मंगळवारी (२९ मार्च) रात्री कात्रजच्या गणेश पार्क सोसायटीतही अशाच प्रकारे वाहने जाळण्याची घटना घडली. पोलिसांनी तातडीने तपास करत या प्रकरणाचा छडा लावला अन् घटनेचे कारणही स्पष्ट झाले. आपल्याच मामाच्या लहान मुलाने मोटारीला रंग लावल्याने त्याचा बदला घेण्यासाठी मामाची दुचाकी जाळण्याच्या ‘उद्योगा’त या प्रकरणातील आरोपीने तब्बल १९ वाहने जाळली. विशेष म्हणजे आरोपी वाहतूक व्यावसायिक असून, त्याची पत्नी प्राध्यापिका आहे.
प्रणय दिलीप धाडवे (वय २९, रा. राजगड बंगला, संतोषनगर) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. वाहतूक व्यावसायिक असलेल्या धाडवेकडे दुधाचे दोन टँकर आहेत. कात्रजच्या गणेश पार्क सोसायटीमध्ये त्याच्या मामाची सदनिका आहे. रंगपंचमीच्या दिवशी धाडवे याने त्याची मोटार या सोसायटीच्या पार्कीगमध्ये लावली होती. मुले रंग खेळत असताना धाडवे याच्या मामाचा मुलगा श्रेयश बाठे याने धाडवेच्या मोटारीला रंग लावला होता. त्यातून दोघांमध्ये वादही झाला होता. मोटारीला रंग लावल्याचा राग धाडवेच्या मनात होता. बदला घेण्यासाठी त्याने मामाची दुचाकी जाळण्याचे ठरविले. मंगळवारी पहाटे पेट्रोलमध्ये बुडविलेला कापडाचा तुकडा त्याने मामाच्या दुचाकीच्या मागच्या चाकाला बांधला व त्याला आग लावून तो तेथून निघून गेला.
एक दुचाकी जाळण्यासाठी त्याने लावलेली ही आग क्षणातच पसरली व सोसायटीच्या पार्किंगमध्ये असलेल्या पंधरा दुचाकी व चार मोटारींनीही पेट घेतला. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागली असल्याची शक्यता सुरुवातीला व्यक्त करण्यात येत होती. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला व सोसायटीतील दहा ते पंधरा जणांची चौकशी करण्यात आली. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला विश्वासात घेऊन त्याच्याकडेही चौकशी करण्यात आली. मंगळवारी पहाटे चार ते पाच जण सोसायटीकडे आले असल्याची माहिती त्यातून पोलिसांना मिळाली. त्यानुसार तपासणी व चौकशी केली असता धाडवे याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने केलेल्या प्रकाराची कबुली दिल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त छगन वाकडे यांनी सांगितले. धाडवे याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा नाही. केवळ बदला घेण्याच्या प्रयत्नात त्याने हे कृत्य केले. एक वाहन पेटविल्यानंतर ही आग मोठय़ा प्रमाणात भडकेल, याचीही त्याला कल्पना नव्हती, असे परिमंडल दोनचे उपायुक्त पंकज हडाणे यांनी सांगितले.