पुण्याच्या महापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दत्ता धनकवडे यांना, तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसने आबा बागूल यांना संधी देण्याचा निर्णय बुधवारी घेतला. त्यानुसार या दोघांचे अर्ज बुधवारी दाखल झाले. महापौर व उपमहापौर पदासाठी १५ सप्टेंबर रोजी निवडणूक होत असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असल्यामुळे या दोघांचाही विजय निश्चित मानला जात आहे.
महापालिकेतील सत्तेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे आणि महापौरपद राष्ट्रवादीकडे, तर उपमहापौरपद काँग्रेसकडे आहे. पालिकेत राष्ट्रवादीचे ५२ व सहयोगी २ असे ५४, काँग्रेसचे २९, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे २८, भारतीय जनता पक्षाचे २६ आणि शिवसेनेचे १५ असे मिळून १५२ नगरसेवक आहेत. त्यामुळे आघाडीकडे ८३ आणि युतीकडे ४१ मते आहेत.
महापौर पदासाठी राष्ट्रवादीकडे धनकवडे यांच्यासह बाबूराव चांदेरे, प्रशांत जगताप, विकास दांगट, बाळासाहेब बोडके आणि सचिन दोडके असे सहा अर्ज आले होते. त्यामुळे पक्ष कोणाला संधी देणार याबाबत उत्सुकता होती. दत्ता धनकवडे या वेळी महापालिकेत दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. धनकवडी भागातून (प्रभाग क्रमांक ७३ अ) ते निवडून आले असून महापालिकेतील महत्त्वाचे पद त्यांना आतापर्यंत मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांना संधी मिळाली पाहिजे, असा अनेक नगरसेवकांचा तसेच पक्षातील पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता. पक्षाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांला महापौर पदावर काम करण्याची संधी दिली आहे. पक्षाने जी संधी दिली आहे त्याचा उपयोग शहराच्या विकासासाठी करेन, असे धनकवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
काँग्रेसमध्ये सात जण उपमहापौर पदासाठी इच्छुक होते. पक्षाने आबा बागूल (प्रभाग क्रमांक ६७ अ) यांना संधी दिली असून त्यांनी यापूर्वी स्थायी समिती अध्यक्ष तसेच विरोधी पक्षनेता यासह अन्य समित्यांवर काम केले आहे. ते या वेळी सलग पाचव्यांदा महापालिकेवर निवडून आले आहेत.
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतर्फेही या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यात आले असून महापौर पदासाठी भाजपचे योगेश टिळेकर (प्रभाग क्रमांक ६२ ब) यांनी त्यांचा अर्ज भरला. उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे भरत चौधरी (प्रभाग क्रमांक ६३ अ) यांनी अर्ज भरला आहे. अर्ज भरताना सर्व पक्षांचे पदाधिकारी महापालिकेत उपस्थित होते. महापालिका सभागृहात १५ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे.