18 January 2019

News Flash

शहरातलं गाव : धनकवडी – सर्वपक्षीय सामंजस्याची दूरदृष्टी

सातारा रस्त्यापासून धनकवडी गावातून जाणारा चढाचा रस्ता थेट गावठाणात जातो.

आनंद सराफ

दक्षिण पुण्याच्या विकासाच्या वाटचालीचा वेध घेताना धनकवडी हा महत्त्वाचा टप्पा आहे. पेशवाई काळात शनिपार आणि अकरा मारुती मंदिर या दक्षिण सीमा होत्या. पुढे खडकाचा माळ, शेतजमिनी आणि थेट कात्रजच्या डोंगररांगांपर्यंत तुरळक वाडय़ा-वस्त्या, असेच चित्र होते. आता मेट्रो, स्मार्ट सिटीच्या जमान्यात शहरानजीकची उपनगरे आमूलाग्र बदलली आहेत. नव्या पिढीतील लोकप्रतिनिधींमुळे विकासाचे नवनवीन आयाम पुढे येत आहेत. या आणि अशा सर्व परिमाणांचे प्रतिबिंब धनकवडी परिसरात निश्चितपणे जाणवते.

धनकवडीच्या ठळक वैशिष्टय़ांचा आढावा घेताना पूर्वीच्या शेतजमिनी, पावसावर अवलंबून असलेली शेती, दूध आणि पूरक व्यवसाय, मोजक्या विहीरींमुळे पाणी पुरवठय़ाची सोय असे चित्र साधारणपणे १९७० पर्यंत होते. त्यानंतर जमीन धारणा कायद्याची चाहूल लागल्याने मिळेल त्या मोबदल्यात जमिनीची विक्री, त्यावरील अनियंत्रित बांधकामे, स्वस्त घरांच्या उपलब्धीमुळे आणि शहराच्या सान्निध्यामुळे मध्यमवर्गीयांचा वाढता प्रतिसाद, परप्रांतीय आणि गुंडांच्या टोळ्यांमुळे परिसराची बदनामी, त्याचबरोबर सक्षम पोलीस अधिकाऱ्यांमुळे वचक, वृक्षतोड झाली तरी हिरवाई टिकवण्याचे लक्षणीय प्रयत्न, भारती विद्यापीठ आणि नव्याने आलेल्या शिक्षण संस्थांमुळे खुली झालेली विकासद्वारे. युवा पिढीचे क्रीडा प्रेम आणि लौकिकप्राप्त गणेशोत्सव मंडळे, ढोल ताशा संघ.. अशी सर्वसाधारण ओळख आता धनकवडीच्या नव्या स्वरूपाची आहे.

सातारा रस्त्यापासून धनकवडी गावातून जाणारा चढाचा रस्ता थेट गावठाणात जातो. इथेच शेवटचा बसस्टॉप आणि छोटे मैदान आहे. चव्हाटा, जानूबाई देवस्थान, तालीम, पाण्याची टाकी, शाळा असे सर्व काही येथे आहे. गावात होणाऱ्या महत्त्वाच्या सभा, मेळावे, मोर्चे इथेच होतात. गावाची मुख्य दहीहंडी जानुबाई मंडळाची असते. धनकवडीचे ग्रामदैवत जानूबाई हे आहे. त्याचबरोबर विठ्ठल-रुक्मिणी मारुती, म्हस्कोबा, कानिफनाथ ही देवस्थाने ग्रामस्थांची श्रद्धास्थाने आहेत. राणूबाई, मरीआई, लक्ष्मी आई आणि शंकरमहाराज मठ ही भक्ति पीठे आहेत. शंकर महाराजांचे समाधी स्थळ इथेच आहे. या मठामध्ये चालणाऱ्या धार्मिक उपक्रमांमध्ये पुणे शहरवासीयांचा मोठा सहभाग असतो. जानुबाई देवस्थान आणि तिथे स्थापन केलेल्या इतर मूर्ती यांच्या व्यवस्थापनामध्ये गावक ऱ्यांच्या लोकवर्गणीचा मोठा सहभाग असतो.

धनकवडी गावाची भौगोलिक स्थिती विचारात घेता कात्रजपासून स्वारगेटपर्यंत उताराची जमीन आहे. पावसाच्या पाण्यावरच हंगामी, कोरडवाहू शेती होते. या संपूर्ण टापूत मोजक्या विहिरी आणि आंबील ओढय़ाचे अस्तित्व होते, त्यामुळे लोकवस्तीला मर्यादा होत्या. ही स्थिती अगदी १९८० पर्यंत होती. धनकवडीतील मोडक विहिरीचे पाणी गावाची तहान भागवीत होते. गावात शाळा चालवणाऱ्या ज्येष्ठ शिक्षिका गीता दुवेदी आणि नायडू मॅडम यांनी विद्यार्थ्यांसाठी विनासंकोच, पाण्याचे बॅरल खांद्यावरून रोज नेल्याची माहिती मिळाली.

धनकवडीमध्ये काही मोजक्या विहिरी होत्या. त्यामध्ये मोडक, आहेर, राऊत यांच्या विहिरी गावकऱ्यांसाठी खुल्या होत्या. कोरडय़ा विहिरीत टँकरमधून पाणी आणून ओतले जात होते. १९८० साली धनकवडी स्मशानभूमीजवळ मोठी विहीर खोदून तिथेच टाकी उभारण्यात आली. कुंजीर परिवारापैकी जगन्नाथ तात्याबा, शिवाजी यांनी जमीन उपलब्ध करून दिली. इंदलकर, संभाजी जगताप तसेच गायकवाड इंगळे परिवार यांनी टाकी उभारणीत पुढाकार घेतला आणि या परिसरातील वस्त्यांना पाणीपुरवठा सुलभ झाला. तळजाई पठारावर १९८३ साली रा.स्व.संघाचे भव्य शिबिर झाले. त्या वेळेचे नियोजन हे अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींना प्रेरणादायी ठरले. तात्या भिंताडे हे धनकवडी ग्रामपंचायतीचे सरपंच होते.

धनकवडीच्या दक्षिण सरहद्दीला भारती विद्यापीठ आहे. १० मे १९६४ रोजी विद्यापीठाची स्थापना झाली. येथील भव्य शिक्षण संकुलामध्ये प्रतिवर्षी आता सुमारे चाळीस हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. धनकवडी गावठाणात मारुती मंदिराच्या पारावरच जिल्हा परिषदेची शाळा भरत असे. त्यानंतर धर्मावत यांनी दिलेल्या जमिनीवर विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून आणि बाबुराव म्हस्के,बापूसाहेब धनकवडे यांच्या पुढाकारातून भव्य शाळा उभी राहिली. पुढील काळात प्रियदर्शनी इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या शाळा उभ्या राहिल्या. प्रेरणा प्रायमरी शाळा आणि नायडू बाईंची मराठी माध्यमाची शाळा यांचेही धनकवडीच्या शिक्षण विकासात योगदान आहे.

धनकवडी गावाच्या विकासाचा विचार करता जुनेजाणते प्रतिष्ठित आणि युवा कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींचा उल्लेख अपरिहार्य आहे. उत्तमोत्तम कार्य करणारी आणि सातत्याने गुणवत्तापूर्ण पारितोषिके मिळवणारी गणेशोत्व मंडळे यांचा उल्लेख आवश्यक आहे. गावाची मूळची जमीनदार घराणी म्हणून धनकवडे, तापकीर, चव्हाण, मोडक, खेडेकर यांची नावे आहेत. धनकवडे मंडळी पूर्वीचे राशीनचे काळे. तत्कालीन गावखाती व्यवहारातील कवडी चलनामुळे त्यांचे नाव धनकवडे झाले, अशी माहिती मिळाली. गावकी जपण्यामध्ये जुन्या जाणत्या मंडळींची नावे समजली. बापूसाहेब धनकवडे, विठ्ठलराव धनकवडे, एकनाथराव आहेर, फुलाबाई खेडेकर, नामदेवराव आणि बापू चव्हाण.

धनकवडीतील गणेशोत्सव मंडळांनी आता स्वत:ची ओळख तयार केली आहे. आदर्श मंडळाने गुन्हेगार पुनर्वसन आणि गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात केलेल्या कार्याची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. जयनाथ मंडळाने क्रीडा क्षेत्रात ठसा उमटवून तरुण पिढीला बलोपासनेचे धडे दिले आहेत. पंचरत्नेश्वर मंडळाने रक्तदान कार्यात सातत्य ठेवले आहे. अष्टविनायक, युगंधरा, प्रभात, जीवनधारा ही मंडळेदेखील लौकिकप्राप्त आहेत. अनिल भोसले, अनिल बढाने, प्रवीण निगडे, दत्ता अर्जुन, संजय भैलुमे, सागर भागवत, अप्पा परांडे, अरुण नाईक, विवेक खटावकर यांनी कार्यकर्तृत्वाने धनकवडीच्या लौकिकात भर टाकली आहे. धनकवडी विकासाच्या वाटचालीत राजमुद्रा, कलानगर, रक्षालेखा, रिक्षा सोसा., गुलाबनगर, एस.बी.आय. कॉलनी, साई कृपा, हिलटॉप, समीर, श्रीहरी, ऊर्मिला इ. सोसायटी महत्त्वाच्या आहेत. धनकवडी गावाची माहिती संकलित करताना अनेकांशी संवाद साधला, त्याचा संक्षिप्त आढावा. दत्ता धनकवडे म्हणाले, अर्बन लॅण्ड सीलिंग अ‍ॅक्ट लागू होण्यापूर्वी जमीन विक्रीचे बेसुमार व्यवहार आणि त्यातून उभ्या राहिलेल्या बेकायदेशीर बांधकामांमुळे विकासाचा समतोल बिघडला. माणुसकीने गावपण जपण्याचा प्रयत्न करतोय. भीमराव तापकीर म्हणाले, गावाच्या विकासामध्ये महिला वर्गाचा मोठा सहभाग आहे. मावळी पद्धतीच्या घरांची ही वस्ती, आता इथे श्रद्धास्थाने जपून अधिकाधिक विकासकार्ये आणण्याचा माझा प्रयत्न आहे. प्रा. फुलचंद चाटे यांनी पालकांचा पाल्यांशी सुसंवाद कमी होतोय, याकडे लक्ष वेधले. बाळासाहेब धनकवडे यांनी गावपण जपताना नव्या जमान्याची जोड देतोय. तरुणांमध्ये क्रीडा क्षेत्राची आवड जपण्याचा प्रयत्न आहे, असे सांगितले. विशाल तांबे यांनी बहुउद्देशीय भवन हे स्वप्न साकारत आहे. परिसर विकासाची कार्ये आणि दूरदृष्टीची वाटचाल हे ध्येय आहे, असे सांगितले. तात्या भिंताडे म्हणाले, गावाचा महसूल वाढण्यासाठी गावकऱ्यांना प्रवृत्त केले.

विक्रमी उत्पन्नाचा गावाच्या विकासाला उपयोग झाला. कांतीलाल ओस्वाल यांनी बालाजीनगरकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन आता बदलतोय. व्यापारी आणि सराफ मंडळींच्या संघटना विधायक कार्याकडे झुकताहेत, असे सांगितले. सोपान चव्हाण यांनी राजमुद्रा सोसायटी उभी रहाताना स्थानिक सर्वपक्षीय नेतृत्वाचा समंजसपणा अनुभवला. सर्वाचा विकास हा दूरदृष्टीनेच साधता येतो, असे सांगितले. श्रीरंग आहेर यांनी पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, शिक्षण, श्रद्धास्थानांचा विकास अशा बाबतीत भेदाभेद दूर ठेवल्यानेच गावाचा विकास झाला, असे सांगितले. मधुकर नवले यांनी धनकवडीतील ८५० ज्येष्ठ नागरिक हे संघटनेचे सभासद आहेत. त्यांच्यासाठी उभारलेले विरंगुळा केंद्र दिलासादायक ठरावे, असे सांगितले. या लेखनासाठी, भेटीगाठी, संदर्भ मिळवून देण्यासाठी बजरंग निंबाळकर आणि उदय जगताप यांचे सहकार्य उपयुक्त ठरले.

First Published on June 14, 2018 2:13 am

Web Title: dhankawadi village dhankawadi politics