06 July 2020

News Flash

ढोल-ताशा पथके म्हणजे बेहिशोबी पैसे सांभाळणाऱ्या तिजोऱ्या

पुण्यातील ढोल-ताशा पथकांचा बाजार झाला आणि त्याचबरोबर पथकांमधील बेहिशोबी आर्थिक उलाढालही मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे.

| August 26, 2015 04:27 am

पुण्यातील ढोल-ताशा पथकांचा बाजार झाला आणि त्याचबरोबर पथकांमधील बेहिशोबी आर्थिक उलाढालही मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. बहुतेक पथकांचे आर्थिक व्यवहार हे रोख रकमांमध्ये होत असल्यामुळे काही स्थानिक नेत्यांना आणि मंडळाना पथकांच्या रूपाने पैसे सांभाळण्यासाठी हक्काची ‘तिजोरी’ मिळाली आहे.पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरामध्ये सध्या नोंद झालेली आणि न झालेली पथके ही साधारण २३० च्या आसपास असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आर्थिक गणित जमत नाही म्हणून या वर्षी २० ते २५ पथके बंद झाली असली, तरी तेवढीच नव्याने सुरूही झाली आहेत. अप्पासाहेब पेंडसे यांनी १९७० साली पहिल्यांदा ज्ञान प्रबोधिनी ढोल-ताशा पथकाची सुरुवात केली. त्यानंतर अनिल गाडगीळ यांनी विमलाबाई गरवारे महाविद्यालय पथकाची सुरुवात केली. नंतर नू.म.वि.प्रशाला, रमणबाग अशा शाळांमध्ये एक उपक्रम म्हणून सुरू झालेली पथकांना डीजेला उत्तर म्हणून एका चळवळीचेच रूप आले आणि पथके शाळेच्या बाहेरही सुरू झाली. मात्र, गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये या पथकांची आर्थिक उलाढाल वाढत गेली. तुलनेने कमी भांडवल, फुकट काम करणारे मनुष्यबळ, मिळणारी प्रसिद्धी आणि कोणत्याही हिशोबाचा जाच नसलेल्या या पथकांच्या अर्थकारणाने नेते मंडळींना भुरळ घातली. संस्कृती जोपासण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या चळवळीला आता बेहिशोबी रकमा सांभाळणाऱ्या तिजोरीचेही स्वरूप येऊ लागले आहे.सध्या या पथकांची उलाढाल ही दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे दिसत आहे. छोटय़ा पथकांचे मानधन हे अगदी दहा हजार रुपयांपासून सुरू होते ते अगदी एका मिरवणुकीसाठी २ लाख रुपये मानधन घेणारीही पथके आहेत. सरासरी मानधन हे साधारण २० हजार रुपये आहे. अनेक मोठय़ा पथकांची फक्त गणेशोत्सवाच्या काळातील मिरवणुकांची उलाढाल ही २ ते ३ कोटी रुपयेही आहे. पथकांसाठी सुरक्षेबाबत असलेले काही जुजबी नियम सोडले, तर आर्थिक उलाढाल, नोंदणी, हिशोब यांबाबत काहीच नियम नाहीत. त्यामुळे या आर्थिक उलाढालीवर कोणतेही नियंत्रण नाही. मोजकी ४० ते ५० पथके वगळता इतर पथकांची नोंद नाही. त्यामुळे या पथकांचे हिशोब तपासलेच जात नाहीत. बहुतेक पथके मानधनही रोख घेतात आणि गणेश मंडळेही त्यालाच प्राधान्य देतात.काही पथके मिळालेले मानधन हे सामाजिक कार्यासाठी वापरतात, तरुणांसाठी नवे उपक्रम सुरू करतात. मात्र, असे काम करणाऱ्या पथकांची संख्या ही बोटावर मोजण्याइतकीच आहे. काही पथके मिळालेल्या मानधनातील रक्कम वादकांना देतात. पण बहुतेक पथकांमधील वादक हे हौशीच असतात. त्यांना कोणतेही मानधन मिळत नाही. अनेक पथके ही फक्त नफा मिळवण्याच्या उद्देशानेही सुरू झाली आहेत.

नेता बनण्याचा राजमार्ग
पथकांकडे तरुणाई आकर्षित होते. पथकांमध्ये सहभागी होत असलेल्या तरुणाईची संख्या ही आठ ते दहा हजार आहे. त्यामुळे नेता होण्याचा सोपा मार्ग म्हणूनही पथकांकडे पाहिले जात असल्याचे दिसत आहे. एरवी फ्लेक्सबाजीत गुंतलेले दादा, भाई, राव पथके सुरू करण्याकडे वळले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2015 4:27 am

Web Title: dhol tasha teams is disproportionate money lockers
Next Stories
1 BLOG : गुगलचा पुणेरी चकवा!
2 पुण्यात स्विमिंग पूल आणि बांधकामासाठी पालिकेचे पाणी वापरण्यावर बंदी
3 ढोलाच्या दणदणाटाला बाजारी स्वरूप!
Just Now!
X