मधुमेह आणि हृदयविकारावर दीर्घ काळ घ्याव्या लागणाऱ्या औषधांपैकी २३ प्रकारची औषधे आता स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकणार आहेत. ‘महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन’ या संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. रविवारी (२२ मार्च) ही औषधे पुरवणाऱ्या शाखेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
संघटनेच्या औषध विक्रेत्यांनी एकत्र येऊन ‘महाराष्ट्र सेफ केमिस्ट अँड डिस्ट्रिब्युटर्स अलायन्स लिमिटेड’ ही कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीने ‘क्यूमॅप’ (क्वालिटी मेडिसिन्स अॅट अॅफोर्डेबल प्राइस) या नावाने एक शाखा सुरू केली असून या शाखेतर्फे स्वस्त औषधांचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. त्याद्वारे राज्यभरातील औषधविक्रेत्यांकडे ही औषधे मिळू शकतील. मधुमेह आणि हृदयविकारावरील २३ औषधांनंतर टप्प्याटप्प्याने इतर औषधेही स्वस्तात उपलब्ध करून दिली जाणार आहेत.  
संघटनेच्या पश्चिम विभागाचे सचिव अनिल बेलकर म्हणाले, ‘‘मधुमेह आणि हृदयविकारावरील २३ औषधे इतर कंपन्यांपेक्षा कमी दरात पुरवण्यात येणार आहेत. या औषधांचे उत्पादन आम्ही करत नसून त्यांच्या विपणनाचे काम आमची कंपनी करत आहे. ही औषधे जेनेरिक औषधांसारखीच आहेत. मात्र ती जेनेरिक नसून ‘क्यूमॅप’ या ‘ब्रँड’ नावाने ती पुरवली जाणार आहे. या औषधांची ‘एमआरपी’ कमी ठेवण्यात आली आहे.’’
कंपनीच्या स्वस्त औषध शाखेचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासन आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते केले जाणार आहे. केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट, भारती विद्यापीठ परिसर ज्येष्ठ नागरिक संघ आणि श्रीधर नगर परिसर ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.