राज्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी या वर्षीपासून सुरू करण्यात आलेली नैदानिक चाचणी आता एप्रिलमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक गोविंद नांदेडे यांनी दिली. मात्र, चाचणीच्या बदललेल्या वेळापत्रकामुळे केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळातील विद्यार्थ्यांना वर्ष सुरू होताच चाचणीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
शिक्षण विभागाने राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या क्षमता तपासण्यासाठी या वर्षीपासून नैदानिक चाचणी सुरू केली. वर्षांच्या सुरुवातीला पायाभूत चाचणी आणि त्यानंतर वर्षांतून दोन चाचण्या असे स्वरूप ठरवण्यात आले होते. राज्यातील सर्व मंडळाच्या शाळांना या चाचण्या बंधनकारक करण्यात आल्या आहेत. मात्र पहिल्यापासून या चाचण्यांचे वेळापत्रक पुढे सरकले. पहिली चाचणी आणि त्यानंतर त्याचे निकाल सरल प्रणालीत भरण्यामध्ये बराच वेळ गेला. त्यामुळे तीन चाचण्यांपैकी दुसरी चाचणी रद्दच करण्यात आली. आता तिसरी चाचणी एप्रिलमध्ये घेण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात ही चाचणी होणार असल्याची माहिती नांदेडे यांनी दिली.
एप्रिलमध्ये केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांचे (सीबीएसई) नवे शैक्षणिक वर्ष सुरू होते. त्यामुळे या मंडळाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना नवे शैक्षणिक वर्ष सुरू होताच चाचणीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पुढील वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी नेमकी कोणत्या वर्षांची चाचणी द्यायची अशीही शंका शाळांकडून उपस्थित करण्यात आली आहे. राज्य मंडळाच्या शाळांच्याही परीक्षा या दरम्यान असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. याबाबत ‘चाचणी सर्व शाळांना बंधनकारक असणार आहे. याबाबत सीबीएसईच्या शाळांशी चर्चा करण्यात येईल,’ असे नांदेडे यांनी सांगितले.