माझ्या पदवीधर मतदारसंघात एकूण पाच जिल्हे येतात तर शरद पवार हे एकाच मतदारसंघातून निवडून येतात. त्यांनी केव्हा पाच जिल्ह्यातून निवडणूक लढविली का? अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रकांत पाटील शरद पवारांवर पलटवार केला आहे. चंद्रकांत पाटलांनी जनतेतून निवडून येऊन दाखवावे, असे विधान शरद पवार यांनी केले होते.

शरद पवारांच्या विधानावर टीका करताना पाटील म्हणाले, पक्ष जो आदेश देईल त्याचे मी पालन करणारा कार्यकर्ता आहे. माझे वैशिष्ट्य आहे की मी कधीही कोणाच्याही विधानावर चिडत नाही. त्यांना काहीही बोलू द्या मी त्याकडे लक्ष देत नाही.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधून किती नेते संपर्कात आहेत या प्रश्नावर ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून येणार्‍या नेते मंडळींची यादी खूप मोठी आहे. ती लवकरच जाहीर करू. काँग्रेसमधून हे नेते मंडळी बाहेर पडू नयेत यासाठी काँग्रेसकडून राज्यासाठी एक अध्यक्ष आणि पाच कार्याध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्यात आगामी निवडणुकीत साडेचार कोटी मतदारांपैकी भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांना किमान १ कोटी ७० लाख मतदान होईल. या निवडणुकीत महायुतीच्या २२० हून अधिक जागा येतील, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. महायुतीकडून जागा वाटपाबाबत अनेक नेत्याकडून विधाने केली जात आहे. यावर ते म्हणाले, राज्यातील विद्यमान आमदार तेच राहतील पण एखादी दुसरी जागा इकडे तिकडे होईल.

आमचा पक्ष ‘आओ जाओ घर तुम्हारा’ असा नाही : चंद्रकांत पाटील

राधाकृष्ण विखे-पाटील भाजपामध्ये येऊन आता मंत्री झाले आहेत. सुजय विखे-पाटीलही खासदार आहेत. त्यामुळे तेथील जिल्ह्यांची चिंता आता नको. आता आम्हाला काँग्रेस संस्कृतीमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. इनकमिंगची संख्या प्रचंड असली तरी आमचा पक्ष ‘आओ जाओ घर तुम्हारा’ नाही. बाहेरून येणार्‍याना आम्ही आधी पारखून घेतो. त्यामुळेच गेल्या पाच वर्षांत निष्ठावंतांनाच मंत्रिमंडळात संधी दिली आहे. फक्त विखे पाटीलांना त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे स्थान दिले आहे.