पुणं बदलतयं, पुण्याचं महानगर होतंय, आमच्या वेळचं पुणं आता नाही बुवा, ते पुणं काही वेगळंच होतं.. अशा चर्चा पुण्यात नेहमीच सुरू असते. आता सगळीच शहरे विस्तारत आहेत त्याला पुणं तरी कसं अपवाद राहील? देशभरातील गावांची शहरं होतायंत, शहरांची महानगरं होतायत, त्याला पुण्याने तरी का अपवाद ठरावे. त्यामुळे पुणं बदलणार, वाढणार, या बदलात जुन्या अनेक गोष्टी पुसल्या जाणार, शहराची मूळ ओळख पुसली जाऊन वेगळ्या गोष्टी इथे रुजणार हेही तसे अपरिहार्यच. पिढी बदलते तशी दृष्टीही बदलते. अनुभवांचं विश्व बदलत जातं. शहर फार फार बदललं आहे अशी चर्चा जोर धरते. अर्थात, प्रत्येक पुणेकर या बदलणाऱ्या आणि वेडय़ावाकडय़ा वाढणाऱ्या शहराचा अनुभव अगदी रोज घेत आहे; पण म्हणून सारं काही बदललं आहे, असं मानण्याचं कारण नाही. जरा आजूबाजूला बघितलं, तर असंही अनुभवायला येतं, की पुण्यातील कितीतरी गोष्टी अजून बदलेल्या नाहीत. त्या अगदी पूर्वीप्रमाणे जशाच्या तशा आहेत. सगळ बदललयं म्हणण्याच्या फॅशनमुळे न बदललेल्या गोष्टींचं महत्त्व आपण उगाचच कमी करतोय असं कधी कधी वाटतं राहतं.
पुण्यातील कितीतरी पक्के पुणेकर आजही बदललेले नाहीत. आता आठवा जरा तुमच्या सहवासात नेहमी येणारी काही पुणेकर मंडळी. त्यातल्या कितीतरी जणांना तुम्ही पक्के पुणेकर म्हणू शकाल का नाही? असं असलं, तरी आपण उगाचच म्हणत असतो, पूर्वीसारखे लोक आता नाहीत पुण्यात. पुण्यातली चकचकीत हॉटेल्स बघून पूर्वीची ती लाकडी टेबलांची हॉटेलं कुठे गेली असा प्रश्न कोणाला पडला, तर त्याने फडके हौद चौकाजवळ असलेल्या वैद्य मिसळीला अवश्य भेट द्यावी. वैद्य मिसळीचे आता १०२ वे वर्ष सुरू आहे आणि व्यवसायाच्या स्वरुपात कोणताही चकचकीत बदल न करताही वैद्य उपाहार गृह आजही खवय्यांच्या गर्दीने भरून गेलेले तुम्हाला दिसेल. इथे सगळा कारभार आजही पूर्वीप्रमाणेच आहे. म्हणजे सकाळच्या सत्रात तुम्ही भजी, वडा किंवा थालिपीठ मागितलेत तर ते तुम्हाला मिळणार नाही. कारण हे पदार्थ दुपारी तीन ते साडेसातच्या सत्रातील आहेत आणि दुपारी पोहे मागितलेत तर तेही मिळणार नाहीत. कारण ते सकाळी साडेसात ते साडेबाराच्या सत्रात मिळतात. दोन्ही सत्रांमध्ये मिळणारा कॉमन पदार्थ म्हणजे मिसळ. इथले लाकडी बाक, टेबलवरचे संगमरवर, जुने आरसे, काचांवर काढलेली देवतांची चित्रं. सारं काही पूर्वीच्या पुण्याची साक्ष देणारं आहे.
बदल न झालेलं पुणं पाहायचं असेल, तर पुण्यातल्या पारंपरिक व्यवसायांच्या ठिकाणी जरा चक्कर टाका. तिथेही तुम्हाला पूर्वीचचं पुणं पाहायला मिळेल. महात्मा फुले मंडई परिसरातल्या गोपाल विहार या बासुंदी केंद्रात तुम्ही कधी गेलायत का? नसाल तर आवर्जून जा. सकाळी लवकर उठून जुन्या मंडईतील ताजी भाजी खरेदी करून परत जाताना गोपाल विहारमध्ये चक्कर टाकली, तर कोळशाच्या शेगडीवर तयार झालेली मस्त दाट बासुंदी तुम्हाला मिळेल. या दुकानाचीही हीच खासियत की, गेल्या कित्येक वर्षांत दुकानाच्या रचनेत जराही बदल झालेला नाही. नेहमी मशीनमेड आणि रेडिमेड बासुंदी खाणाऱ्यांनी कधी या बासुंदीचा आस्वाद घेतला, तर मग समजेल की, अरे आहेत, पुण्याच्या खुणा आजही या शहरात टिकून आहेत.
गणेश पेठेतील दूधभट्टीवर तुम्ही कधी गेलायंत का? अर्थात तिथला माहोल अनुभवायचा तर सकाळी खूप लवकर जायला हवं. व्यवसायांमध्ये किती प्रगती झाली आणि तंत्रज्ञान वगैरे आलं असं म्हटलं जात असलं, तरी देखील पुण्याच्या परिसरातून दूध घेऊन आलेल्या गवळ्यांकडून दूध खरेदी करण्यासाठी जी गिऱ्हाईकं दूधभट्टीवर आलेली असतात त्यांच्यात आणि गवळ्यांच्यात होणारे सौदे एकदा पाहाच. दूध किती दाट आहे हे पाहण्यासाठी आलेला ग्राहक समोरच्या दुधाच्या बरणीत नाहीतर कळशीत थेट उजवा हात बुडवतो. हात बुडवून बाहेर काढल्यानंतर पंजाला, मनगटाला आणि हाताला किती दूध चिकटलं आहे, त्याच्यावरून त्याचा दाटपणा आणि दुधाचा भाव ठरवण्याचा तो कार्यक्रम पाहिला की, मनात येतं अरे, कुठं बदललंय पुणं?
पुण्यातला कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम पाहा. त्याला येणारे रसिक पाहा. मुळातच, पुण्यात रोज जेवढे सांस्कृतिक कार्यक्रम होतात तेवढे कार्यक्रम क्वचितच कोण्या शहरात वा महानगरात होत असतील. पूर्वी देखील असेच कार्यक्रम व्हायचे आणि आता तर ते अधिक संख्येने होऊ लागले आहेत. पीवायसी मैदानाच्या अप्पाच्या कॅन्टिनमध्ये जा बदल वगैरे शब्द या हॉटेलच्या कोशातच नाहीत अशी तेथील परिस्थिती आहे. कधी शनिपाराच्या चौकात दुपारी उभे राहा. पुणेकरांच्या दोन बाजूला दोन रांगा दिसतील. एक असते चितळ्यांच्या दुकानात प्रवेश मिळावा यासाठी आणि दुसरी असते कांताबेन केंद्रात खाकरे घेण्यासाठी. अहो, कितीही मॉल येऊ देत, किती हॉटेल येऊ देत, फास्टफूड का काय म्हणतात त्याची कितीही दुकानं उघडू देत. या आणि अशा अनेक दुकानांबाहेरील पुणेकरांच्या रांगा कधी कमीच होत नाहीत, उलट त्या वाढतायतं! शास्त्री रस्त्यावरच्या अजंठा या वैशिष्टय़पूर्ण मिठाईविक्री कम हॉटेलमध्येही कधी तरी जायला पाहिजे. रमणबागेशेजारच्या प्रभा विश्रांती गृहातही जायला पाहिजे.