05 August 2020

News Flash

‘शिवसेना’ हे नाव दिलं तेव्हा छत्रपतींच्या वंशजांना विचारलं होतं का?; उदयनराजेंचा संजय राऊतांना टोला

शिवसेना भवनावर शिवाजी महाराजांची प्रतिमा कुठे लावली आहे असा सवालही त्यांनी यावेळी शिवसेनेला केला?

उदयनराजे भोसले

शिवाजी महाराजांवरुन काहीही झालं तरी तुम्ही वंशजांना विचारा म्हणता. तुमच्या पक्षाला शिवसेना हे नाव दिलं तेव्हा त्यांच्या वंशजांना विचारायला आला होतात का? असा परखड सवाल छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी विचारला आहे. याद्वारे त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. ‘आजके शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

उदयनराजे म्हणाले, “राज्यात काही झालंतरी ब्लेम गेम होत असतो. ज्यांची लायकी नाही ती बिनपट्ट्याचं माणसं सध्या बोलत आहेत, अशा लोकांनी आपली लायकी ओळखून रहावं. शिवाजी महाराजांवरुन काहीही झालं तरी तुम्ही वंशजांना विचारा म्हणता. तुमच्या पक्षाला शिवसेना हे नाव दिलं तेव्हा त्यांच्या वंशजांना विचारायला आला होतात का? शिवसेना आम्ही कधीही हरकत घेतली नाही. कारण शिवाजी महाराजांचे आम्ही जरी वंशज असलो तरी शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा सर्व देशाला लाभला आहे. मी तर असं म्हणेन की तुम्ही सर्वजण शिवाजी महाराजांची एक्सेंडेट फॅमिली आहात. शिवसेना भवनावर शिवाजी महाराजांची प्रतिमा कुठे लावली आहे असा सवालही त्यांनी यावेळी शिवसेनेला केला?”

“तुमच्या गलिच्छ राजकारणाचं खापर आमच्या माथ्यावर फोडू नका”

“महाशिवआघाडीतून ‘शिव’ हे नाव का काढलं? शिववडा हा काय प्रकार आहे? शिवाजी महाराजांचं नाव वड्याला देता, याची तुम्हाला लाज वाटत नाही का?” असे अनेक सवालही यावेळी उदयनराजे यांनी शिवसेनेला विचारले. तसेच “तुमच्या गलिच्छ राजकारणाचे खापर आमच्या माथ्यावर फोडू नका. तुम्हाला समज देतोय की पुन्हा जर असं केलंत तर त्याच्या परिणामाला तुम्हाला समोरं जावंच लागेल. तुमची वेळ आता संपली आहे. त्यामुळे तुमच्या पक्षाला  ‘शिवसेना’ म्हणणं सोडून द्या, त्यापेक्षा ‘ठाकरे सेना’ म्हणा. महाराष्ट्रातील जनता मूर्ख नाही. शिवसेना नाव काढून टाकल्यानंतर किती तरुण तुमच्या मागे उभे राहतात ते पहा, थोडी तरी लाज बाळगा,” अशा शब्दांत उदयनराजे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.

“पक्षांनी शिवाजी महाराजांचे नाव घेण्यापेक्षा त्यांचे विचार घ्यावेत”

“जे माझ्या बुद्धीला पटत नाही ते मी करीत नाही. हा उदयनराजे आहे, कुणाच्या मागे पुढे पळालो नाही आणि पळणारही नाही. त्यामुळं खासदारकीचं जाऊनच द्या, निवडून आल्यावरही मी राजीनामा देऊन टाकला. यापुढं कुणीही काहीही बोलायचं आम्ही ऐकून घ्यायचं हे चालायचं नाही. कुठलाही पक्ष असू दे त्यांची महाराजांचं नावं घेण्याची काय लायकी आहे. त्यापेक्षा त्यांचे विचार त्यांनी घ्यायला हवेत.” अशा शब्दांत उदयनराजे यांनी सर्व पक्षांना खडेबोल सुनावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 1:00 pm

Web Title: did you ask the maharajas descendants when your party gave the name of shiv sene says udayan raje bhosale aau 85
Next Stories
1 पिंपरी-चिंचवडमध्ये टोळक्याचा हैदोस; रॉडने १८ वाहनांची केली तोडफोड
2 प्लास्टिकची अंडी ही निव्वळ अफवा
3 वादग्रस्त पुस्तकाच्या निषेधार्थ ‘राष्ट्रवादी’चे आंदोलन
Just Now!
X