पाणी समजून डिझेल प्यायल्याने दीड वर्षाच्या एका चिमुकल्याचा अंत झाला आहे. पुण्यातल्या देहू या ठिकाणी ही घटना घडली आहे. वेदांत गौतम गायकवाड असे या चिमुकल्याचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. डिझेल प्यायले गेल्याने त्याची प्रकृती बिघडली. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

देहूगाव परिसरातल्या विठ्ठलवाडी या टिकाणी वेदांतचं घर आहे. त्याचे आई-वडील आणि मोठी बहिण यांच्यासह तो या ठिकाणी रहात होता. त्यांच्या घरात गॅसऐवजी स्टोव्हचा वापर केला जातो. स्टो पेटवण्यासाठी डिझेल वापरले जाते. डिझेलची बाटली जमिनीवर पडली होती. वेदांत घरात खेळत होता, खेळता खेळता त्याने पाणी समजून डिझेल प्यायले. त्यानंतर लगेचच तो उलटी करू लागला त्याचे डोळेही पांढरे झाले. वेदांतच्या आईला ही बाब लक्षात आली. वेदांतच्या आईने तातडीने त्याला खासगी रूग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर उपचार सुरू झाले. परंतु, रात्री उशिरा त्याची मृत्यूशी झुंज संपली त्याचा या घटनेत मृत्यू झाला. वेदांतचे आई वडील दोघे ही मजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकतात. मयत दीड वर्षीय वेदांत पेक्षा काही महिन्यांची एक मुलगी आहे. सुखी संसार सुरू होता. मात्र या घटनेमुळे सर्वच बदलून गेले आहे. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.