शहरात धुमाकूळ घातलेल्या सोनसाखळी चोरांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या यंत्रणेच्या जाळ्यात वेगवेगळे सोनसाखळी चोर अडकत असताना गुन्हे करण्याची प्रत्येकाची पद्धत मात्र एकच असल्याचे स्पष्ट होत आहे. सुरुवातीला शहरातील वेगवेगळी ठिकाणाहून वेगाने धावू शकणाऱ्या दुचाकींची चोरी करायची व याच दुचाकीचा वापर करून रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविण्याचा गुन्हा करायचा.. अलीकडे पकडण्यात आलेल्या सर्वच सोनसाखळी चोरांकडून हीच पद्धत वापरण्यात आली असून, अशाच पद्धतीने गुन्हा करणाऱ्या आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.
सकाळी किंवा संध्याकाळी फिरण्यास जाणाऱ्या वृद्ध महिला, लग्नसमारंभ किंवा खरेदीसाठी रस्त्याने एकटय़ा जाणाऱ्या महिलांना हेरून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकविण्याच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत. महिलेच्या पाठीमागून किंवा पुढील दिशेने दुचाकीवरून दोनजण येतात. ही दुचाकी अचानक महिलेच्या अगदी जवळ येते व तिचा वेग कमी होतो. दुचाकीवर मागे बसलेली व्यक्ती काही कळण्यापूर्वीच महिलेच्या गळ्यात हात घालते व सोनसाखळी हिसका देऊन तोडते. काही क्षणात घडलेल्या या प्रकारानंतर दुचाकीवरील दोघे भरधाव निघून जातात.
पोलिसांनी आजवर पकडलेल्या सोनसाखळी चोरांनी ही पद्धत अवलंबली आहे. गुन्ह्य़ासाठी वापरण्यात येणाऱ्या दुचाकीला बनावट क्रमांक वापरला जात होता. काही वेळेला दुचाकीच्या क्रमांकाची पाटी दिसणार नाही, अशी व्यवस्था केली जात होती.
मात्र, अलीकडच्या काळात पकडण्यात आलेले सोनसाखळी चोर हे दुचाकी चोरही असल्याचे स्पष्ट होत आहे. सोनसाखळी चोरीचे गुन्हे करण्यापूर्वी शहराच्या
विविध भागांमधून त्यांनी दुचाकींची चोरी केली व त्याच दुचाकी वापरून त्यांनी सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले. या पद्धतीने गुन्हे करणारे विविध आरोपी पोलिसांनी पकडले आहेत. सोमवारीही गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अशा दोन आरोपींची नावे जाहीर केली.