‘मश्रीं’ची पायरी साहित्यरसिकांना प्रेरणा देणार
राज्याच्या साहित्य परंपरेतील आद्यसंस्था असा लौकिक असणारी महाराष्ट्र साहित्य परिषद वर्धापनदिनाचे औचित्य साधून मसापचे संस्थापक आणि मसाप जन्मस्थळाच्या स्मृती जागवणार आहे. तसेच परिषदेचे निष्ठावान कार्यकत्रे आणि ज्येष्ठ लेखक म. श्री. दीक्षित यांच्याही स्मृती जागवण्यात येणार आहेत.
मसापच्या या नव्या उपक्रमाची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. मििलद जोशी यांनी दिली. मसापचा ११० वा वर्धापनदिन २६ आणि २७ मे रोजी साजरा होणार आहे. मसापच्या स्थापनेत मोलाची भूमिका असणारे न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक आणि साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांचे एकत्रित छायाचित्र असलेली दुर्मीळ प्रतिमा मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात लावली जाणार आहे. तसेच मसापच्या स्थापनेची अधिकृत घोषणा जेथे झाली, त्या मळेकर वाडय़ाची प्रतिमाही संस्थेत लावण्यात येणार आहे. या प्रतिमांचे अनावरण २७ मे रोजी मसापचे अध्यक्ष प्रा. रावसाहेब कसबे आणि माजी अध्यक्ष प्र. चिं. शेजवलकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती प्रा. जोशी यांनी दिली.
एकशे दहा वर्षांपूर्वी न. चिं. केळकर यांनी मसापच्या स्थापनेची अधिकृत घोषणा २७ मे रोजी केली होती आणि लोकमान्य टिळकांनी या घोषणेला अनुमोदन दिले होते. या निमित्ताने मसापच्या स्थापनेचा गौरवशाली इतिहास आणि समृद्ध परंपरांचे पुनर्जागरण व्हावे, हा उद्देश या कार्यक्रमामागे आहे. तसेच पुणे शहराचा आणि साहित्य परिषदेचा चालताबोलता इतिहास अशी ख्याती असणारे म. श्री. दीक्षित हे साहित्यरसिकांचा आदर्श होते. परिषदेचे कार्यालय अधीक्षक, कार्यवाह, कोषाध्यक्ष, विश्वस्त अशा अनेक नात्यांनी ते परिषदेशी निगडीत होते. या साहित्यरसिकाच्या स्मृती जपण्यासाठी परिषदेत आल्यावर जिथे दीक्षित सर विसाव्यासाठी बसत, ती जागा यापुढे ‘मश्रींची पायरी’ म्हणून ओळखली जाईल. तशी कोनशिलाही तेथे लावली लावण्याची योजना आहे, अशीही माहिती देण्यात आली.