रस्ते विक्रेत्यांच्या विळख्यात

 

पुणे : शहरातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असताना भाजी विक्रीच्या वेगळया तऱ्हेने पुन्हा डोके वर काढले आहे.  वाहतुकीने गजबजलेले रस्ते असोत किंवा नदीपात्रातील प्रशस्त रस्ते; दोन्ही बाजूला भाजी, फळे किंवा अन्य वस्तूं असलेल्या गाड्या रस्त्याच्या बाजूला उभ्या करून त्यांची विक्री करण्याचा नवा प्रकार सुरू झाला आहे. नदीपात्रातील रस्ता, सिंहगड रस्ता, नीलायम चित्रपटगृह रस्ता या ठिकाणी या प्रकारे विविध वस्तूंची सर्रास विक्री होत आहे. त्याकडे अतिक्रमण निर्मूलन विभागाचेही दुर्लक्ष झाले आहे.

 

या प्रकारामुळे वाहनचालकांना त्यामुळे अडथळा निर्माण होऊन  लहान मोठा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच रस्त्यांवरच विके्रते फिरत असल्यामुळे गजबजलेल्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीही होत आहे.

 

शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणांवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई करण्यात येते. अतिक्रमण विभागाकडून कारवाई होईल, या भीतीपोटी आता विक्रेत्यांनी रस्त्यावरच गाड्या लावून विविध वस्तूंची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. सिंहगड रस्ता, नदीपात्रातील रस्त्याबरोबरच उपनगरांकडे जाणाऱ्या रस्ते या प्रकारच्या विक्रेत्यांनी व्यापण्यास सुरुवात केली आहे. टाळेबंदीच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर हा प्रकार पुन्हा वाढला आहे.

 

रस्त्याच्या कडेला गाडी लावून विक्रेता रस्त्याच्या मधोमध जोरजोरात ओरडून वस्तू विक्री करण्यासाठी वाहनचालकांपुढे येतात. स्वेटर, गॉगल्सचे टेम्पोसह भाजीविक्री, फळविक्रेते, रसाची फिरती गुºहाळे सध्या रस्त्यांवर सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. वस्तू विक्रीसाठी मोठमोठ्या आवाजात ओरडत विक्रेते रस्त्याच्या मधोमध येऊन वाहनचालकांना अडथळा करत आहेत. विशेष म्हणजे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी कारवाईसाठी येत असल्याचे निदर्शनास आल्यास पोबारा केला जात आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी या प्रकारच्या विक्रेत्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघातांची शक्यताही वाढली आहे. विक्रेत्यांकडून पदपथांचा वापर केला जात असल्यामुळे पदपथांवरून विना अडथळा चालणेही पादचाऱ्यांना अडचणीचे ठरत आहे. विक्रेत्यांच्या ओरडण्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्याबाबत नागरिकांकडून क्षेत्रीय कार्यालयाकडे सातत्याने तक्रारीही करण्यात आल्या आहेत. मात्र या अतिक्रमणांकडे अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे अतिक्रमणांमध्येही वाढ होत आहे.

 

सिंहगड रस्ता परिसरात राजाराम पूल परिसरातील रस्त्यांवरील विक्रेत्यांचा सातत्याने त्रास होत आहे. दुचाकीस्वारासमोर अचानाक विक्रेते येतात. त्यांच्या आवाजामुळेही ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. अतिक्रमण कारवाई झाल्यानंतर काही तासांतच पुन्हा रस्ते व्यापले जातात. या प्रकारच्या विक्रेत्यांवर बंदोबस्त करणे आवश्यक आहे.

 

वसुंधरा देव-शिरूरकर