महापालिकेच्या गलथानपणामुळे महत्त्वाकांक्षी प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता

पुणे :  शहराअंतर्गत वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाबाबत (हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रूट- एचसीएमटीआर) महापालिका प्रशासनाचा गलथानपणा सुरू आहे. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. करोना आपत्तीमुळे या मार्गाच्या कामांसाठी निधी देता येणार नाही, ही महापालिके ची भूमिका चुकीची आहे. मार्गासाठी निधीच्या पर्यायांचा विचार करावा आणि हा प्रकल्प पूर्णत्वास न्यावा, अन्यथा न्यायालयीन लढा दिला जाईल, अशी भूमिका माजी उपमहापौर, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी मांडली.

करोना संकटामुळे महापालिके पुढे आर्थिक तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामे सुरू ठेवण्यात येणार असून काही प्रकल्पांची कामे लांबणीवर टाकण्यात आली आहेत. यामध्ये वर्तुळाकार मार्गाचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत आबा बागुल यांनी हा प्रकल्पाला गती देण्याची मागणी के ली.

ते म्हणाले,की गेल्या चाळीस वर्षांपासून हा प्रकल्प प्रलंबित आहे. सन १९८७ च्या विकास आराखडय़ामध्येही (डेव्हलपमेंट प्लॅन- डीपी) हा रस्ता दर्शविण्यात आला होता. राज्य शासनाने सन २०१७ मध्ये विकास आराखडय़ाला मंजुरी दिल्यानंतर मार्गाची आखणी निश्चित करण्यात आली. त्यानुसार जागतिक पातळीवर निविदा काढण्यात आल्या. या परिस्थितीमध्ये हा मार्ग करण्याची क्षमता नाही, ही आयुक्तांची भूमिका चुकीची आहे.

मार्गासाठी सद्य:परिस्थितीत निधी देता येणार नाही, असे सांगून प्रकल्प लांबणीवर ढकलण्यात येत आहे. प्रशासनाच्या गलथानपणामुळेच ही स्थिती ओढावली आहे. ज्या वेळी हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला त्या वेळी तो के वळ पाचशे कोटी रुपयांत झाला असता. मात्र सातत्याने चालढकल के ल्यामुळे मार्ग उभारणीचा खर्च सहा हजार कोटींवर गेला आहे.

मार्ग लांबणीवर ढकलणे म्हणजे तो अप्रत्यक्षररीत्या रद्द करण्याचा प्रकार आहे. महापालिके च्या मालकीच्या अनेक मोकळ्या जागा आहेत. त्या बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वावर किं वा त्यातील काही भूखंडांची मुख्य सभा आणि राज्य शासनाच्या मान्यतेने विक्री करून हा प्रकल्प मार्गी लावता येऊ शकतो. मात्र निधीचे कारण देऊन लांबणीवर टाकण्याचा प्रकार म्हणजे मार्ग गुंडाळण्याचीच भूमिका आहे, असे आबा बागुल यांनी सांगितले.