सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवी, पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणारे काही आंतरराष्ट्रीय विद्यार्थी करोना संसर्गामुळे अडचणीत आले आहेत. या विद्यार्थ्यांना मायदेशी जाण्याची आस असून, परीक्षा होणार की नाही, करोना संसर्गाची स्थिती केव्हा आटोक्यात येणार, कधी विमानसेवा सुरू होणार असे त्यांच्यासमोर प्रश्न आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अफगाणिस्तान, इराण, आफ्रिका खंडातील काही देशांतील विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी येतात. विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतिगृहात राहाणाऱ्या विद्यार्थ्यांची करोना संसर्गामुळे मोठीच अडचण झाली आहे, शासनाच्या नियमांमुळे त्यांना बाहेरही पडता येत नाही. त्या शिवाय अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांसमोर परीक्षा होणार की नाही हाही प्रश्न आहे.

विद्यापीठातील काही आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांशी लोकसत्ताने संवाद साधला. ‘आम्ही विचित्र परिस्थितीत अडकलो आहोत. कारण परीक्षा होणार की नाही या बाबत काहीच स्पष्टता नाही. तसेच मायदेशी जाण्यासाठी विमानसेवाही उपलब्ध नाही. अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबतचा निर्णय झाल्यास मायदेशी जाण्याबाबत आम्ही विचार तरी करू शकतो. त्याशिवाय विमानसेवा सुरू झाली, तरी सध्याच्या काळात असलेले तिकिटांचे दरही परवडणारे नाहीत. आमच्यासोबतचे अनेक विद्यार्थी टाळेबंदीपूर्वीच आपापल्या देशात परत गेले आहेत. त्यामुळे परीक्षा घ्यायचा निर्णय झाल्यास ती ऑनलाइन पद्धतीनेच घ्यावी लागेल. अन्यथा मायदेशी गेलेले विद्यार्थी परीक्षांना मुकतील. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे येथील सरकार केवळ स्थानिक विद्यार्थ्यांचा विचार करते. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचाही विचार सरकारने करायला हवा. आम्ही विद्यापीठाच्या वसतिगृहात राहत असल्याने विद्यापीठ प्रशासन, आंतरराष्ट्रीय केंद्राकडून आवश्यक सुविधा दिल्या जात आहेत. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे मायदेशी जाण्याचीही आस आहे,’ असे काही आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी सांगितले.

व्हिसाची मुदत संपली..

काही आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या व्हिसाची मुदतही संपली आहे. सध्याच्या परिस्थितीत वास्तव्यासाठी व्हिसाचे नूतनीकरण करून घ्यावे लागणार आहे. त्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे सादर करून ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, काही विद्यार्थी नोकरी करताना सुटी घेऊन शिक्षणासाठी येतात. आता त्यांना जास्त काळ राहावे लागल्यास त्यांना नोकरी गमावण्याचाही धोका आहे, अशी माहितीही विद्यार्थ्यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय वसतिगृहात सध्या सुमारे ११० विद्यार्थी-विद्यार्थिनी राहत आहेत. त्यातील अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. सध्या विमानसेवा सुरू नसल्याने त्यांना त्यांच्या देशात जाता येत नाही. सरकारने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यास आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. सध्या या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवण्याची काळजी घेतली जात आहे.

— डॉ. विजय खरे, संचालक, आंतरराष्ट्रीय केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ