News Flash

सुभाषनगरमध्ये नव्या खोदकामाला प्रारंभ

पावसाळ्याच्या तोंडावर या भागातील रस्ता चार महिने खणून ठेवू नये अशी येथील नागरिकांची मागणी असली, तरी या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

| May 21, 2015 03:13 am

सुभाषनगरमध्ये नव्या खोदकामाला प्रारंभ

शहरातील सर्व खोदकामे बंद करण्याचे तसेच जेथे खोदाई केली आहे, ते रस्ते तातडीने पूर्ववत करण्याचे आदेश महापौर आणि आयुक्तांनी दिल्यानंतरही शहरात खोदाई सुरू असल्याचे चित्र असून सुभाषनगरमध्ये काँक्रिटच्या रस्त्यासाठी बुधवारी सकाळी खोदाईला सुरुवात करण्यात आली. पावसाळ्याच्या तोंडावर या भागातील रस्ता चार महिने खणून ठेवू नये अशी येथील नागरिकांची मागणी असली, तरी या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
शहरात २० मे पासून खोदकामे करू नयेत तसेच सुरू असलेली कामे तातडीने थांबवून रस्ते पूर्ववत करावेत, असे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिले होते. आयुक्त कुणाल कुमार यांनीही अशाच प्रकारचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आणि उर्वरित कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करावीत अशा सूचना दिल्या. महापौर आणि आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार खोदाई बंद होणे तसेच रस्ते दुरुस्ती, रस्त्यांचे डांबरीकरण ही कामे तातडीने सुरू व्हायला हवी होती.
या आदेशांच्या पाश्र्वभूमीवर सुभाषनगरमधील नागरिकांना वेगळाच अनुभव येत आहे. येथील गल्ली क्रमांक चार मधील रस्ता काँक्रीटचा करण्याचे काम सुरू असून हे काम गेले तीन आठवडे सुरू असले, तरी कामात कोणतीही प्रगती नाही. दोन-तीन फूट व्यासाचे मोठे पाइप टाकण्याच्या कामासाठी रस्ता खणण्यात आला आहे.  
गल्ली क्रमांक चारमध्ये ही परिस्थिती असताना बुधवारी सकाळी अचानक गल्ली क्रमांक सातमध्ये ठेकेदाराचे कामगार आले आणि त्यांनी रस्ता खोदायचा आहे, तुमच्या गाडय़ा काढून घ्या असे रहिवाशांना सांगितले. त्यानंतर त्यांनी रस्ता खोदायला सुरुवात केली. हा प्रकार पाहून नागरिकांना आश्चर्य वाटले. त्यांनी पावसाळ्याच्या तोंडावर रस्ता खोदून ठेवू नका अशी विनंती ठेकेदाराला केली, तरीही काम थांबले नाही. त्यानंतर नागरिकांनी तातडीने अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे दाद मागितली. स्थानिक पंचेचाळीस रहिवाशांनी रस्त्याचे काम पावसाळ्याच्या तोंडावर करू नये असे निवेदन बकोरिया यांना दिले. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात हे काम थांबवण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2015 3:13 am

Web Title: dig pmc commissioner rainy season
Next Stories
1 अभ्यासाला कंटाळल्यामुळे आत्महत्येचा संदेश फेसबुकवर टाकला – अभिजित व्यवहारे
2 पिंपरीत गुंडांकडून वाहनांची तोडफोड
3 जनता सहकारी बँकेला ६५ कोटींचा नफा
Just Now!
X