शहरातील सर्व खोदकामे गुरुवारी (३० एप्रिल) बंद करण्याचे आदेश देण्यात आले असले, तरी शहरातील अनेक रस्त्यांवरील सद्यस्थिती पाहता खोदकाम खरोखरच बंद होईल अशी परिस्थिती नाही. अनेक महत्त्वाच्या आणि मोठी वाहतूक असलेल्या रस्त्यांवर अद्याप खोदकाम अर्धवटच असल्याने त्या रस्त्यांवरील दुरुस्ती महापौरांच्या आदेशानुसार २० मे पर्यंत पूर्ण होणे कठीण आहे.
शहरातील रस्ते लवकरात लवकर दुरुस्त होण्यासाठी यंदा आधीपासूनच काळजी घेण्यात येत असली आणि तसे आदेश संबंधितांना दिले जात असले, तरी ज्या कंपन्यांनी रस्ते खोदाई केली आहे त्यांची कामे जागोजागी अर्धवट असल्यामुळे कंपन्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्याची कामे महापालिकेकडून म्हणजेच महापालिकेने नेमलेल्या ठेकेदारांकडून सुरू होणार आहेत. त्यामुळे अनेक रस्त्यांची कामे केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील काही महत्त्वाचे रस्ते आणि अर्धवट असलेली कामे-
पौड रस्ता- गेले काही वर्षे अपूर्ण कामामुळे पौड रस्ता चर्चेत आहे. या रस्त्यावरील कामे पूर्ण होण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी वेळोवेळी आंदोलनेही केली होती. तरीही पौड रस्ता पूर्ण झालेला नाही. या रस्त्याचे सर्व काम येत्या दोन दिवसात पूर्ण होण्याची शक्यताही नाही.
कर्वे पुतळा चौक, भेलकेनगर- महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीतर्फे सुरू असलेली कोथरूड भागातील या चौकांमध्ये सुरू असलेली खोदाई अर्धवट आहे. हे दोन्ही महत्त्वाचे आणि गर्दीचे चौक असल्यामुळे तेथील काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी असली तरी दोन्ही चौकातील कामे अर्धवट आहेत.
शास्त्री रस्ता- या रस्त्यावर केबल टाकण्यासाठी मोठय़ा प्रमाणात खोदाई केली जात आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार ज्या बाजूचा रस्ता खोदण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे त्या बाजूचा रस्ता न खोदता तो बरोबर विरुद्ध बाजूला खोदला जात आहे. परवानगी नसलेल्या भागात या रस्त्यावर खोदाई सुरू असूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही, अशी तक्रार करण्यात आली आहे.
नाना पेठ, अरुणा चौक- मध्य पुण्यातील अनेक रस्ते गेले काही महिने उखडलेले होते. ते कसेतरी दुरुस्त करण्यात आले असले, तरी नाना पेठेतील महत्त्वाचे रस्ते अद्यापही दुरवस्थेतच आहेत.
गणेश पेठ ते घोरपडे पेठ– गणेश पेठेतील महाराणा प्रतापसिंह रस्ता घोरपडे पेठेपर्यंत चांगला होणे आवश्यक असले तरी त्याची जागोजागी चांगलीच दुरवस्था झाली आहे.
कसबा पेठ- कसबा पेठेतील तांबट हौद परिसरातही तशीच परिस्थिती आहे. येथील रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.
मार्केटयार्ड परिसर- मार्केटयार्ड परिसरात उत्सव हॉटेल चौक ते पोस्ट ऑफिस चौक ते गंगाधाम चौक येथे रिलायन्स कंपनीची कामे सुरू आहेत. ही मोठय़ा अंतरातील खोदाई असल्यामुळे ती गुरुवारी थांबेल अशी परिस्थिती नाही.
पूनावाला गार्डन ते गिरीधर भवन- पूनावाला गार्डन ते गिरीधर भवन येथेही रिलायन्स कंपनीची केबल टाकण्याचे काम सुरू असून ते पूर्ण करून रस्ते पूर्ववत होण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे.
बिबवेवाडी ते अपर इंदिरानगर- येथे केबल टाकण्याचे काम रोज रात्री सुरू आहे. हे काम रात्री केले जाते आणि सकाळी थांबवले जाते. मात्र कामाची व्याप्ती मोठी असल्यामुळे खोदकाम थांबवण्यात आलेले नाही.