प्रत्येकाच्या आरोग्याची र्सवकष माहिती एकाच ठिकाणी नोंद असलेले देशातील पहिले ई-हेल्थ कार्ड बनविण्याचा बहुमान ‘एनकॉर्ड हेल्थ कार्ड’ या पुण्यातील कंपनीने पटकाविला आहे. एखाद्या व्यक्तीला त्याचा वैद्यकीय तपशील कोठेही सोबत नेण्याची सुविधा प्राप्त झाली असून डॉक्टरांना या कार्डच्या आधारे आपत्कालीन स्थितीमध्ये वेळेवर उत्तम वैद्यकीय सेवा देता येणे शक्य होणार आहे.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशातील शहरांच्या आणि गावांच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याच्या उद्देशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘डिजिटल इंडिया’ हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ‘एनकॉर्ड’ने या हेल्थ कार्डाच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. ‘नॅशनल हेल्थ पोर्टल’मध्ये समाविष्ट केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे हे ई-हेल्थ कार्ड बनविण्यात आले असल्याची माहिती कंपनीचे मुख्य पालक दीपक शिकारपूर आणि सहयोगी नीलेश कांदळगावकर यांनी शनिवारी दिली. इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्या हस्ते या ई-हेल्थ कार्डाचे अनावरण करण्यात आले.