News Flash

नवोन्मेष : डिजिटल साक्षरतेसाठी

  रिलायन्स कम्युनिकेशनमधील छोटय़ा आणि मध्यम उद्योगांसाठी पंकज काम करत होते.

डिजिटल हा शब्द आपण वारंवार ऐकतो. डिजिटल साधनांच्या वापराने आपले दैनंदिन व्यवहार सुसह्य़ झाले आहेत. परंतु अनेक छोटे आणि मध्यम व्यावसायिक अद्यापही आपल्या व्यवसायाची माहिती ठेवण्याचे काम, व्यवहार पारंपरिक पद्धतीनेच करतात. अशा व्यावसायिकांना डिजिटल करण्याचे उद्दिष्ट पंकज विजय एलचटवार नावाच्या तरुणाने ठेवले आहे. छोटय़ा, मध्यम व्यावसायिकांची गरज ओळखून पंकज यांनी न्यूऑज सीएक्स कॉर्पोरेशन नावाची कंपनी सुरू केली आहे.

पंकज एलचटवार यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन विज्ञान विभागांतर्गत (पुम्बा) एमबीए  केले. त्यानंतर काही वर्षे खासगी कंपनीत नोकरी केल्यानंतर गेल्या वर्षी त्यांनी कंपनीची स्थापना केली. कंपनीकडून कस्टम सॉफ्टवेअर विकसित करणे, मानवी पद्धतीने सुरू असलेली व्यवस्था क्लाउडवर स्थलांतरित करणे, जोहोच्या अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून सॉफ्टवेअर विकसित करणे, जोहो आणि अ‍ॅमेझॉन वेब सव्‍‌र्हिसेसची अ‍ॅप्लिकेशन चालविण्यासाठीचे प्रशिक्षण देणे अशा विविध सेवा दिल्या जातात. सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांचे डिजिटल सबलीकरण होत आहे. म्हणजेच बदलत्या युगात इंटरनेटचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. अशा वेळी व्यावसायिकांना डिजिटल साक्षर करण्याचे काम कंपनीकडून केले जात आहे.

रिलायन्स कम्युनिकेशनमधील छोटय़ा आणि मध्यम उद्योगांसाठी पंकज काम करत होते. तेथे काम करत असताना लहान व्यावसायिक आपली माहिती, डेटा एक्सलमध्येच संकलित करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या व्यावसायिकांना डिजिटल व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशातून त्यांना व्यवसायाची कल्पना सुचली आणि त्यांनी कंपनीची स्थापना केली. नव्याने व्यवसाय सुरू केल्यानंतर बाजाराची गरज ओळखण्यासाठी काही कालावधी गेला. त्यानंतर छोटय़ा आणि मध्यम व्यावसायिकांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. परंतु, हे व्यावसायिक आपल्या व्यवसायाच्या पारंपरिक चौकटीतून बाहेर पडून डिजिटल स्वरूपात येण्यासाठी वेळ घेतात. त्यामुळे त्यांना त्याची गरज पटवून देऊन उत्पादनाची विक्री केल्यानंतर पैसे मिळवण्यासाठी अडचणी येत असत. व्यवसाय प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने सुरू करून देण्याचे मुख्य काम कंपनीकडून केले जाते. ग्राहक मिळवण्यासाठी स्वत: पंकज छोटय़ा, मध्यम आणि इतर व्यावसायिकांकडे गेले. त्यांना डिजिटल माध्यमाचे महत्त्व समजून देऊन त्यांनी कंपनीसाठी ग्राहक तयार केले. लहान व्यावसायिकांकडे क्लाउडवर येण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची वानवा असते. अशा अडचणींचा सामना करत पंकज यांनी व्यवसाय स्थिरसावर केला.

छोटय़ा आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांमध्ये व्यवसायाचे व्यवहार, माहिती मायक्रोसॉफ्ट एक्सलमध्ये किंवा पारंपरिक पद्धतीने संकलित करण्यात येते. एक्सलमध्ये माहिती संकलित करताना विक्री नेमकी किती झाली हे समजत नाही, ठरावीक दिवशी उत्पादने पोहोचवायची असतील, तर त्या दिवशी आठवण करून देणारे संदेश येत नाहीत, असे काही तोटे असतात. यासाठी त्यांनी डिजिटल माध्यमांच्या आधारे माहिती संकलित केल्यास ती उपयुक्त ठरू शकते. तसेच सध्याच्या डिजिटल जमान्यात शासकीय, खासगी सेवा डिजिटल स्वरूपात मिळत असताना व्यावसायिक म्हणून पारंपरिक पद्धतीनेच व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांसाठी आणि ज्या व्यावसायिकांना अधिकाधिक डिजिटल माध्यमांचा वापर आपल्या उद्योगासाठी करून घ्यायचा आहे, अशा सर्वाना कंपनीकडून विविध सेवा पुरविल्या जातात. जोहो कॉर्पोरेशनसमवेत कंपनीची भागीदारी आहे. जोहोकडून एक सामान्य स्वरूपाचे अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात येते. त्यानंतर ग्राहक असलेल्या व्यावसायिकांच्या गरजा, समस्या शोधल्या जातात. उद्दिष्ट ठरविण्यात येते आणि त्या उद्दिष्टाची कशा पद्धतीने अंमलबजावणी करायची हे शोधून व्यवसायाची व्याप्ती कशी होऊ शकेल, याबाबतचा दस्तऐवज तयार करण्यात येतो आणि ते सॉफ्टवेअर ग्राहकाच्या गरजांनुसार परिपूर्ण करण्यात येते, असे पंकज सांगतात.

कंपनीकडून डिजिटल सेवा, क्लाउड सेवा आणि प्रशिक्षण दिले जाते. डिजिटल सेवेत सीआरएम इम्लिमेंटेशन व कस्टमर एक्सपिरियन्स, क्लाउड सेवेत क्लाउड मायग्रेशन व इन्फ्रास्ट्रक्चर ऑटोमेशन, प्रशिक्षणांतर्गत जोहो आणि अ‍ॅमेझॉन वेब सव्‍‌र्हिसेस यांची विविध अ‍ॅप्लिकेशन चालविण्याचे प्रशिक्षण अशा विविध सेवा दिल्या जातात.  सेवा आणि उत्पादनांबाबत ग्राहक आनंदी आहे किंवा कसे?, याबाबत जाणून घ्यायचे असल्यास ऑनलाइन सर्वेक्षणासारख्या सेवाही पुरविल्या जातात. ग्राहकांचा कंपनीबाबतचा अनुभव अधिक सुदृढ होण्यासाठी उपयोग होतो. तसेच ग्राहकाच्या व्यवसायाची गरज ओळखून त्यानुसार सॉफ्टवेअर विकसित केले जाते. तसेच जोहो आणि अ‍ॅमेझॉन वेब सव्‍‌र्हिसेसची अ‍ॅप्लिकेशन चालविण्यासाठीचे प्रशिक्षण कंपनीकडून दिले जाते, असेही पंकज सांगतात.

prathamesh.godbole@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 1:31 am

Web Title: digital literacy
Next Stories
1 हिंजवडी रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उतारा
2 पुण्यातल्या ‘भारी’ शाळेमध्ये प्रवेशासाठी केला मोदींच्या नावाचा वापर
3 प्रेयसी बोलत नाही म्हणून प्रियकराने घरात घुसून केले वार, पुण्यातील धक्कादायक घटना
Just Now!
X