‘डिजिटल लॉकर’च्या माध्यमातून पुण्यात सुविधा सुरू; चालक परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र जतन करता येणार

पुणे : वाहन चालविण्याचा परवाना आणि वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र खराब झाले, गहाळ झाले किंवा वाहन चालविताना जवळ नसले, तरी चिंता करण्याची गरज नाही. कारण आपली शासकीय आणि वैयक्तिक प्रमाणपत्र संगणकीय यंत्रणेत जतन करून ठेवणाऱ्या ‘डिजिटल लॉकर’मध्ये (डिजीलॉकर) वाहनांशी संबंधित कागदपत्र जमा असून, ‘एम परिवहन’ या मोबाइल अ‍ॅपवरही ती उपलब्ध आहेत. त्यामुळे रस्त्यामध्ये वाहतूक पोलिसांनी मागणी केल्यास मूळ प्रतीऐवजी मोबाइल अ‍ॅपवरील कागदपत्रांची प्रतिमा ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जतन केलेली आपली सर्व प्रमाणपत्र डिजिटल लॉकरमधून जगभरात कोठेही उपलब्ध होण्याबरोबरच आयुष्यभर सुरक्षित राहणार आहेत.

प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी आणि राष्ट्रीय माहिती केंद्राचे तांत्रिक संचालक दीपक सोनार यांनी गुरुवारी याबाबतची माहिती दिली. केंद्रीय माहिती, तंत्रज्ञान विभागाने डिजिटल लॉकर ही संकल्पना आणली असून, विविध शासकीय संस्थांकडून नागरिकांना देण्यात येणारी प्रमाणपत्रं त्यावर जतन करून ठेवण्यात येत आहेत. नागरिकांनी डिजिटल लॉकरचे खाते उघडल्यानंतर ही प्रमाणपत्र उपलब्ध होऊ शकतील. त्याचप्रमाणे स्वत:ची खासगी प्रमाणपत्रही त्यावर साठविणे शक्य आहे. याच डिजिटल लॉकरला परिवहन विभागाशी संबंधित ‘एम परिवहन’ या मोबाइल अ‍ॅपशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे वाहनाशी संबंधित वाहन नोंदणी प्रमाणपत्र आणि वाहन चालविण्याचा परवाना प्रत्यक्षात खिशात बाळगण्याची गरज नाही. डिजिटल लॉकरवर आपले खाते असल्यास गुगल प्ले स्टोअरमधून संबंधित अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. त्या माध्यमातून आपल्या मोबाइलमध्येच ही कागदपत्रं उपलब्ध असतील.

देशभरामध्ये २४ कोटी वाहनांची माहिती डिजिटल लॉकरमध्ये जतन करण्यात आली आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागातील वाहन चालविण्याचे सुमारे १५ लाख परवानेही त्यावर जतन करण्यात आले आहेत. सध्या स्मार्ट कार्ड मिळालेल्या सर्वाचे परवाने डिजिटल लॉकरमध्ये आहेत. खाते सुरू केल्यानंतर ते नागरिकांना उपलब्ध होऊ शकतील. रस्त्यामध्ये वाहतूक पोलिसांनी मागणी केल्यास मोबाइल अ‍ॅपवर दिसणारा परवाना ग्राह्य असणार आहे. संबंधित परवाना खरा की खोटा हे तपासण्यासाठी पोलिसांकडे ई-चलन हे अ‍ॅप्लिकेशन असणार आहे. क्यू आर कोडच्या माध्यमातून त्याची सत्यता पडताळणी केली जाऊ शकते. या सर्व प्रक्रियेमुळे वाहन परवाना, नोंदणी प्रमाणपत्र जारी झाल्यानंतर तातडीने संबंधितांच्या डिजिटल लॉकरला जातील. त्यामुळे ती वेळेत न मिळणे, गहाळ होणे आदी चिंता दूर झाली आहे. त्याचप्रमाणे बनावट कागदपत्र आणि फसवणुकीची शक्यताही दूर झाली आहे.

डिजिटल लॉकरचा वापर, खाते सुरू कसे कराल?

डिजिटल लॉकरचे खाते सुरू करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक असून, तो मोबाइल क्रमांकाशी जोडलेला असणे गरजेचे आहे. ‘डिजीलॉकर’ या संकेतस्थळावर जाऊन  किंवा प्लेस्टोअरमधून डिजीलॉकर हे अ‍ॅप डाऊनलोड करता येते. डाऊनलोड झाल्यानंतर आपला आधार क्रमांक टाकून या अ‍ॅपवर लॉग इन करता येते. आधार क्रमांक टाकल्यानंतर संबंधित नागरिकाच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर  ओटीपी (वन टाईम पासवर्ड) येतो. तो अ‍ॅपवर भरल्यास संबंधित खाते कार्यान्वित होते. या खात्याचा वापर करून डीजीलॉकरशी जोडल्या गेलेल्या विविध शासकीय संस्थांना विनंती पाठवून आपली शासकीय प्रमाणपत्र किंवा दाखले ऑनलाइन पद्धतीने मागविली जाऊ शकतात. त्याचप्रमाणे आपली वैयक्तिक कागदपत्रही स्कॅन करून त्यात जतन करता येतात. प्रमाणपत्र मागविण्याबरोबरच ते विविध विभागांना त्यांच्या मागणीनुसार पाठविणेही डिजीलॉकरमुळे शक्य आहे. प्रमाणपत्रावर ई- स्वाक्षरी करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. सध्या विविध शासकीय संस्था डिजीलॉकरशी जोडल्या आहेत. त्यात मोटार वाहन विभाग, आयकर विभाग, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, गॅस अनुदान आदी विभागाचा समावेश आहे. https://digilocker.gov.in    या संकेतस्थळावर याबाबतची सर्व माहिती उपलब्ध आहे.