News Flash

दिवाळी पहाटही डिजिटल होणार!

स्मृतिगंध पेजला २ लाख १० हजारांच्या घरात लाइक्स आहेत, तर २ लाख ४० हजार फॉलोअर्स आहेत.

फेसबुक, यूटय़ूबद्वारे गाजलेल्या नाटय़पदांवर आधारित संगीत मैफल

फेसबुक, यूटय़ूबद्वारे गाजलेल्या नाटय़पदांवर आधारित संगीत मैफल

पुणे : दिवाळी अंकांचे वाचक कमी झाल्याची ओरड होऊ लागल्यानंतर गेल्या काही वर्षांत डिजिटल दिवाळी अंकांचा कल वाढू लागला. त्या पाठोपाठ आता दिवाळी पहाटही ‘डिजिटल’ माध्यमात दाखल होत आहे. ‘स्मृतिगंध’ या फेसबुक पेजतर्फे या वर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (७ ऑक्टोबर) फेसबुक आणि यूटय़ूबद्वारे गाजलेल्या नाटय़पदांवर आधारित दिवाळी पहाटची संगीत मैफल ‘लाइव्ह’ केली जाणार आहे. डिजिटल पद्धतीने दिवाळी पहाट करण्याचा हा पहिलाच प्रयोग ठरेल.

स्मृतिगंध हे फेसबुकवरील लोकप्रिय पेजपैकी एक आहे. पं. जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे, पं. भीमसेन जोशी, अरुण दाते अशा लोकप्रिय कलाकारांच्या गाण्यांचे व्हिडिओ या पेजवर देण्यात येतात. या व्हिडिओंना मोठा प्रतिसादही लाभला आहे. आता त्या पलीकडे जात तरुण कलाकारांना सोबत घेऊन दिवाळी पहाट डिजिटल करण्याचा अभिनव प्रयोग या पेजवरून होणार आहे. या दिवाळी पहाटमध्ये गायक नचिकेत लेले, शमिका भिडे आणि केतकी चैतन्य सहभागी होऊन नाटय़संगीताची मैफल सजवणार आहेत. मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय नाटय़पदे या मैफलीत सादर केली जातील. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (७ नोव्हेंबर) सकाळी सात वाजता स्मृतिगंधचे फेसबुक पेज आणि यूटय़ूब वाहिनीवरून ही मैफल पाहता येणार असल्याची माहिती पेजचे संस्थापक अमित टिल्लू यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

‘‘संगीत मत्स्यगंधा’ या नाटकाच्या ऑनलाइन निवड चाचणीच्या प्रक्रियेत नाटय़निर्माते अनंत पणशीकर यांच्यासह सहभागी झालो होतो. त्या निवड चाचणीला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे  वेगवेगळय़ा वयोगटांतील लोक समाजमाध्यमांमध्ये वावरत असल्याचे जाणवले. दिवाळी पहाटचे असंख्य कार्यक्रम होतात. मात्र, सर्वानाच या कार्यक्रमांना जाणे शक्य होत नाही. त्यामुळे घरबसल्या दिवाळी पहाटचा आनंद घेता यावा, या विचारातून हा डिजिटल दिवाळी पहाटचा प्रयोग करत आहोत,’ असेही टिल्लू यांनी सांगितले.

प्रयोग यशस्वी होण्याची खात्री

स्मृतिगंध पेजला २ लाख १० हजारांच्या घरात लाइक्स आहेत, तर २ लाख ४० हजार फॉलोअर्स आहेत. त्यामुळे स्वतंत्र असा प्रेक्षकवर्ग आहे. त्याशिवाय वेगवेगळे व्हॉट्सअ‍ॅप समूह देखील आहेत. गेल्या वर्षभरात पेजला मिळालेल्या प्रतिसादावरून डिजिटल दिवाळी पहाटचा प्रयोग नक्कीच यशस्वी होण्याची खात्री आहे, असेही टिल्लू यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 2:20 am

Web Title: digital medium for diwali festival celebration
Next Stories
1 नवोन्मेष : ज्ञाना प्रॉडक्ट्स
2 नाटक बिटक : कामाच्या ठिकाणांचा सुरक्षिततेचा प्रश्न!
3 पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार; हल्लेखोरांकडून धारदार शस्त्राचाही वापर
Just Now!
X