राष्ट्रवादीच्या आमदारांशी कसलेही ‘सेटिंग’ नव्हते, सगळे आमदार एकत्रितपणे आपल्या विरोधात होते. प्रतिस्पर्धी उमेदवार देवदत्त निकम नामधारी होते. विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील स्वत: उमेदवार असल्याप्रमाणे प्रचार करत होते. त्यामुळे खरा सामना वळसेंशीच होता आणि पराभवही वळसेंचाच झाला आहे, अशी प्रतिक्रिया खासदार शिवाजीराव आढळराव यांनी भोसरीत व्यक्त केली. येत्या निवडणुकीत वळसेंचा पराभव निश्चित असून सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिरूर लोकसभेत तीन लाखाच्या मताधिक्याने विजयी होत हॅट्ट्रीक केल्यानंतर प्रथमच भोसरीत आलेल्या आढळरावांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी नगरसेविका सुलभा उबाळे, शहरप्रमुख विजय फुगे, शेखर लांडगे, महादू गव्हाणे आदी उपस्थित होते.
आढळराव म्हणाले,‘‘ निकम आणि वळसे आंबेगावचे आहेत, त्या ठिकाणी आपल्याला १९ हजाराचे मताधिक्य आहे. निकम नामधारी होते, सामना वळसेंशीच होता आणि पराभवही त्यांचाच झाला आहे. विधानसभेत वळसे निवडून येणे अवघड आहे. आमदार विरोधात प्रचार करत होते म्हणूनच आपले मतदान वाढले. सहाही विधानसभा महायुतीजिंकणार आहे. गेल्यावेळी पक्षात काही गद्दार होते, ते बाहेर पडल्याने ‘सुंठीवाचून खोकला’ गेला. आता नियोजनपूर्वक काम करून सहाही विधानसभाजिंकणार आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जूनपासून दौरा सुरू करत आहेत. यंदा उमेदवार लवकर जाहीर करण्याचे धोरण आहे. ससून व यशवंतराव चव्हाण रूग्णालयाच्या धर्तीवर चाकण-खेड-मंचर परिसरात अद्ययावत रूग्णालय उभारण्याचा मानस व्यक्त करतानाच औद्यागिक पट्टय़ात अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैलगाडा शर्यत, रेडझोन तसेच विमानतळाच्या प्रश्नासंदर्भात सकारात्मक दृष्टिकोनाची गरज आहे, असे सूचक मतही त्यांनी व्यक्त केले.
 
‘मनसेला जनतेने नाकारले’
राज ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार करण्याची मनसे कार्यकर्त्यांची मागणी असली तरी लोकसभा निवडणुकीत मनसेला जनतेने नाकारले आहे, याकडे शिवाजीराव आढळराव यांनी लक्ष वेधले. भाजप-शिवसेना युतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेणार आहेत, असे ते म्हणाले.