चित्रकलेच्या प्रांतामध्ये आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटविलेले ज्येष्ठ चित्रकार दीनानाथ दलाल यांची अप्रदर्शित चित्रे पाहण्याची संधी कलाप्रेमी पुणेकरांना शनिवारपासून (३० मे) लाभत आहे. दलाल यांच्या रफ स्केच असलेल्या मूळ चित्रांचाही यामध्ये समावेश असून या चित्रप्रदर्शनानेच ‘आर्ट मंडल’ या नव्या कलादालनाचेही उद्घाटन होणार आहे.
फग्र्युसन रस्त्यावरील हॉटेल ललित महलसमोरील विद्याविलास इमारतीमध्ये हे नवे कलादालन सुरू करण्यात आले आहे. विनायक पारखे आणि आरती पारखे यांनी ‘आर्ट मंडल’ ही संकल्पना साकारली असून युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशातून हा कलामंच निर्माण करण्यात आला आहे. दीनानाथ दलाल यांच्या जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून दलाल यांची अप्रदर्शित चित्रे रसिकांना पाहण्याची संधी या कलादालनाने उपलब्ध करून दिली आहे. ७ जूनपर्यंत दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी पाच वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी ‘दलालांची चित्रकारिता’ या विषयावर प्रसिद्ध चित्रकार दत्तात्रेय पाडेकर बोलणार आहेत. ६ जून रोजी ‘दलालांची शिवचरित्रावरील चित्रे’ या विषयावर इतिहासाचे अभ्यासक केदार फाळके यांचे व्याख्यान होणार असून युवा चित्रकार कुडल हिरेमठ चित्रकलेची प्रात्यक्षिके दाखविणार आहेत. या प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस ‘दलालांविषयी दोन शब्द’ बोलणार आहेत.