मुख्यमंत्री-अजितदादांची मर्जी सांभाळताना आयुक्तांची तारेवरची कसरत
‘नागूपर कनेक्शन’ असलेले पिंपरी पालिकेचे नवे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या नव्या नवलाईचे दिवस संपले असून खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाल्यानंतर आयुक्तांना येथील परिस्थितीचा अंदाज आला असेल. खरेदीतील घोटाळे, टक्केवारीचा धुमाकूळ, सल्लागारांवरील उधळपट्टी, टँकर लॉबीची लूट, नगरसेवकांची ‘ठेकेदारी’, अधिकाऱ्यांची कंत्राटदारांशी भागीदारी, डॉक्टर अधिकाऱ्यांचे राजकारण आणि एकूणच भ्रष्ट आणि मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी आयुक्तांना कठोर पाऊले उचलावी लागणार आहेत. सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचावेच लागते, या ‘आयुक्त परंपरे’ला फाटा देऊन त्यांना स्वतंत्रपणे कारभार करावा लागणार असून मुख्यमंत्री आणि अजितदादांची मर्जी सांभाळताना आयुक्तांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
राष्ट्रवादीच्या दृष्टीने अडचणीचे ठरलेले डॉ. श्रीकर परदेशी यांची अजितदादांनी अवघ्या १८ महिन्यात आयुक्तपदावरून उचलबांगडी केली आणि स्वत:च्या तसेच राष्ट्रवादीच्या सोयीचे असलेले राजीव जाधव यांना आयुक्तपदी आणले होते. मात्र, २०१७ च्या पालिका निवडणुकीतील गणित लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी जाधवांची इनिंग पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली केली. मात्र, २४ महिन्यांच्या कालावधीत जाधव यांनी राष्ट्रवादीला निवडणुकीच्या दृष्टीने पोषक वातावरण करण्यासाठी बरेच सोयीचे निर्णय घेतले. निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या विश्वासातील वाघमारे यांना िपपरीत आणले आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काम करताना त्यांना बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. राष्ट्रवादी म्हणेल तीच पूर्व दिशा, असे येथील कामाचे स्वरूप असून ठराविक नेत्यांच्या हातात पालिकेचा कारभार आहे. त्यांची मनमानी आणि एककल्ली कारभार हा मोठय़ा डोकेदुखीचा विषय आहे. आयुक्त कोणीही असो, त्या मंडळींचे ऐकावेच लागते, अशी परिस्थिती आहे. आयुक्तांच्या हाताखालचे बरेच अधिकारी विविध नेत्यांमध्ये वाटले गेले आहेत. राजकीय पाठबळ असल्याशिवाय काम करता येत नाही, या ठाम मताचे हे अधिकारी अशा नेत्यांच्या घरी पाणी भरतात, त्यांच्याच कलाने काम करतात, हे उघड गुपित आहे. ‘पाहुण्यांच्या’ गोतावळ्यातील एक ‘सर्वपक्षीय अधिकारी’ तर कुणालाच जुमानत नाही. अशा अधिकाऱ्यांना नियंत्रणात ठेवावे लागणार आहे. बहुतांश कर्मचाऱ्यांना शिस्त नावाचा प्रकार माहितीच नाही. कामावर रुजू झाल्यानंतर पहिले दोन तास कर्मचारी उपाहारगृह, हॉटेल किंवा टपऱ्यांवर घोटाळताना दिसतात. नंतर, जेवणाची वेळ झालेलीच असते. त्यानंतर, तासाभरातच त्यांना घरी जाण्याचे वेध लागलेले असतात. मात्र, त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार हे येथील ‘खाऊगल्ली’चे सूत्र राहिले आहे. अजितदादांच्या पिलावळांनी नुसता धुमाकूळ घातला आहे. चार आण्याचे काम बारा आण्याला काढायचे आणि ते वाढवत दोन रुपयांपर्यंत न्यायचे, वाढीव स्वरूपात लाखो रुपयांची बिले मंजूर करायची, हा रोजचा खेळ झाला असून सल्लागारांवर कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी सुरूच आहे. सत्ताधारी, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे त्यात संगनमत आहे. विरोधक नावाला असून सत्ताधाऱ्यांनी फेकलेल्या तुकडय़ांवर समाधान मानण्याची त्यांची वृत्ती वेळोवेळी दिसून आली आहे. आता निवडणुकीचे वर्ष असल्याने राजकीय गोंधळाला, मोर्चे, आंदोलनांना आयुक्तांना सामोरे जावे लागणार आहे. चिंचवडचे संभाजीनगर प्राणीसंग्रहालय नूतनीकरणाच्या खर्चावरून भाजप-राष्ट्रवादीत जे राजकारण झाले, त्यातून आयुक्तांनी बऱ्यापैकी बोध घेतला असावा. मुख्यमंत्री व अजितदादा यांच्यातील शह-काटशहाच्या राजकारणात होणारी ओढाताण पाहता त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
बाळासाहेब जवळकर