पुण्यातून संयुक्त अरब अमिरातीतील शारजा येथे जाण्यासाठी आता थेट विमानसेवा सुरू झाली आहे. स्पाईसजेट या कंपनीने ही विमानसेवा सुरू केली असून, या आंतरराष्ट्रीय सेवेबरोबरच पुणे- चेन्नई या मार्गावरही नवी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.
कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (कमर्शियल) व्ही. राजा यांनी पत्रकार परिषदेत या विमानसेवांची घोषणा केली. यापूर्वी पुण्यातून दुबईसाठी थेट विमानसेवा आहे. त्यानंतर प्रथमच पुण्यातून शारजासाठी विमानसेवा सुरू झाली आहे. पुणे- शारजा ही विमानसेवा सोमवार, बुधवार, गुरुवार, शनिवार या दिवशी सुरू राहील. पुण्यातून रात्री १०.३० वाजता विमानाचे उड्डाण होईल व मध्यरात्री १२.२५ वाजता विमान शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचेल. शारजाहून पुण्यासाठी मंगळवार, गुरुवार, शुक्रवार व रविवारी विमानसेवा देण्यात येईल. शारजाहून मध्यरात्री १.२५ वाजता विमानाचे उड्डाण होईल. पुणे- चेन्नईसाठी दररोज विमानसेवा देण्यात येणार आहे. पुण्यातून रात्री ११ वाजता विमान उड्डाण घेईल व रात्री १२.५५ वाजता ते चेन्नई विमानतळावर पोहोचेल.
 ‘नव्या विमानतळाची नितांत गरज’
पुणे विमानतळाबाबत बोलताना राजा म्हणाले की, ऑटोमोबाईल व माहिती- तंत्रज्ञान उद्योग पुण्यात वाढत असताना हवाई वाहतुकीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सत्तरहून अधिक देश व भारतातील इतर शहरातून विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात. शहराला मालवाहू टर्मिनलचीही गरज आहे. सध्याचे विमानतळ ही वाहतूक करण्यास सक्षम नाही. हवाईदल, लष्करी ऑपरेशनच्या सरावासाठी नागरी विमान वाहतूक दररोज काही तास बंद राहते. शहराची वाढती मागणी लक्षात घेता नवे विमानतळ उभारण्याची नितांत गरज आहे.