चिन्मय पाटणकर

महाविद्यालयीन तरुणांनी एकत्र येऊन नाटक कंपनीही प्रायोगिक नाटय़संस्था सुरू केली. यंदा ही संस्था दशकपूर्ती साजरी करत आहे. या निमित्ताने यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात नाटक कंपनी महोत्सवसुरू आहे. या महोत्सवात संस्थेची आजवरची नाटकं सादर केली जात आहेत. त्याशिवाय काही नवीन, वेगळे कार्यक्रमही होत आहेत. या महोत्सवाच्या औचित्याने संस्थेच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या अभिनेता दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांच्याशी साधलेला संवाद..

नाटक कंपनीला दहा र्वष पूर्ण झाली. तू या प्रवासाकडे कसं पाहतोस?

– खूपच वेगात झाला हा प्रवास असं वाटतंय. काल-परवाच आम्ही संस्था सुरू केली असं वाटतं. मात्र, जरा खोलात गेल्यावर लक्षात येतं, की या दहा वर्षांत खूप काही झालं. संस्थेच्या नाटकांचे परदेशात प्रयोग झाले. त्यासाठी खटाटोप करावा लागला. वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग झाले. वेगवेगळी नाटकं झाली. त्यातून संस्थेची आणि आम्हाला कलाकारांची ओळख निर्माण झाली. सर्वात महत्त्वाचं, या दहा वर्षांत खूप माणसं जोडली गेली.

नाटक कंपनी सुरू झाली, तेव्हा पुण्यातल्या प्रथितयश नाटय़संस्था कार्यरत होत्या. तिथूनही तुम्हाला नाटक करता आलंच असतं. मग वेगळी संस्था सुरू करण्यामागे काय विचार होता?

– मुळात आमच्या हातात सूत्र असावीत, आपल्याला हवे तसे निर्णय घेता यावेत, असं वाटत होतं. बाहेरच्या कुठल्याही संस्थेत काम करताना ते शक्य नव्हतं. कारण, त्या संस्थेतल्या कलाकारांनी काहीएक विचाराने ती संस्था सुरू केलेली असेल, मग आपण जे काही करणार त्याचं उत्तर द्यावंच लागलं असतं. अर्थात त्यात काही चुकीचं नाही. आम्हाला तसं नको होतं. कारण, पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्यावरच वेगळं काहीतरी करता येतं. या सगळ्याचा विचार करता आम्हाला हवं तसं नाटक करण्यासाठी स्वतंत्र संस्था असणंच सोयीचं होतं.

नाटक कंपनीच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत नाटक किती बदललंय असं वाटतं?

– गेल्या दहा वर्षांत संस्थेत खूप नवीन लोक आले. त्यांनी त्यांना हवंतसं नाटक केलं. सतीश आळेकर सरांसारखे ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक आमच्यासारख्या तरुणांच्या संस्थेसाठी ‘महानिर्वाण’सारखं रंगभूमीवर महत्त्वाचं मानलं जाणारं नाटक दिग्दर्शित करतात. त्याचवेळी सिद्धेश पुरकरने लिहिलेलं अतिशय ताज्या विषयावरचं ‘आयटम’ हे नाटक क्षितीश दाते दिग्दर्शित करतो. ही फार वेगळी घटना आहे. संस्थात्मक पातळीवर अशा पद्धतीचं काम होतंय याचा फार आनंद वाटतो. त्याशिवाय दहा र्वष हा मोठा काळ आहे. या दरम्यान बदल घडणं स्वाभाविकच आहे. एखादा माणूसही दहा वर्षांत बदलतो, त्याचे विचार बदलतात, त्याचं आकलन वाढतं. मग त्याचं प्रतिबिंब नाटकातही उमटणारच. आज नाटक बदललंय ही वस्तुस्थिती आहे. आजचं नाटक दृश्यप्रधान आहे. पारंपरिक पद्धतीने शब्दांवर भर नाही. दृश्यांतून आशय निर्माण करण्यावर भर दिला जातो.

दहा वर्षांचा महत्त्वाचा टप्पा गाठल्यानंतर भविष्याच्या दृष्टीने काय विचार आहे?

– संस्थेचे असे काही धोरण ठरलेलं नाही. मनासारखं नाटक करता येतंय, तोपर्यंत संस्था टिकेल. कारण, प्रायोगिक नाटक हे आम्ही समाधानासाठी करतो. त्यातून कुणाला आर्थिकप्राप्ती होत नाही. त्यामुळे मनापासून जे नाटक आवडेल, ते रंगमंचावर आणू. सध्या मी एका व्यावसायिक नाटकात आणि चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. मात्र, त्यानंतर एक प्रायोगिक नाटक करायचं आहे. एक नाटक शोधून ठेवलं आहे. आलोक राजवाडेनेही एक नाटक निवडलं आहे. त्यामुळे २०१८ आणि २०१९ मध्ये संस्थेची दोन नवी नाटकं येतील.

पुण्यातलं प्रायोगिक नाटक बहरण्यासाठी काय व्हावं असं तुला वाटतं?

– दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे, नाटक करता येतील अशा नव्या जागा विकसित करणं आणि ज्या जागा आहेत, तिथल्या सोयीसुविधांची देखभाल करणं आणि त्या जागा चांगल्या ठेवणं. या दोन्हींकडे नीट लक्ष दिलं, तर पुण्यातून प्रायोगिक रंगभूमीवर आणखी चांगलं काम नक्कीच होऊ शकेल.

chinmay.reporter@gmail.com