वापरयोग्य स्वच्छतागृहांबद्दलचे पिंपरी पालिकेचे दावे पोकळ, लाखोंचा खर्च पाण्यात

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील स्वच्छतागृहांची कोणत्याही प्रकारे स्वच्छता होत नसून सिगारेटची पाकिटे, गुटखा-तंबाखूच्या पुडय़ा, दारूच्या बाटल्या असा भरगच्च कचरा स्वच्छतागृहांमध्ये साचलेला दिसून येतो. पालिकेने स्वच्छतागृहांसाठी लाखो रुपये खर्च करण्याचा सपाटा लावला असला, तरी प्रत्यक्षात त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील स्वच्छतागृहे अस्वच्छतेचे आगार असल्याप्रमाणे स्थिती झाली आहे. जवळपास प्रत्येक प्रभागात विशेषत: गर्दीच्या ठिकाणी उपलब्ध जागेनुसार पुरुष आणि महिलांसाठी स्वच्छतागृहे पालिकेने बांधली आहेत.  सुरुवातीच्या काळात तेथे स्वच्छता राखली जात होती, तोपर्यंत नागरिकांना त्याचा उपयोग होत होता. नंतर, स्वच्छतागृहांमध्ये नको ते उद्योग होऊ लागले. गुटखा, तंबाखूची पाकिटे, विटांचे तुकडे, विशिष्ट प्रकारच्या उत्पादनांच्या जाहिराती दिसू लागल्या. दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच जमा होऊ लागला. काही ठिकाणी नागरिकांनी स्वच्छतागृहांचा वापर शौचासाठी केल्याचे दिसून येते. याकडे महापालिकेने कधीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. तेथील स्वच्छतेकडे कानाडोळा केला. त्यामुळे आता फारसे कोणी अशा स्वच्छतागृहांकडे फिरकत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे.

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी ५० ते ६० लाख रुपये वार्षिक खर्चाची व्यवस्था पालिकेने केली आहे. त्यानुसार, पाण्याच्या दाबाचा वापर करून यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्याचा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली. त्याचा चांगला उपयोग होत असल्याचा दावा पालिका अधिकारी करतात.

तथापि, त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधी आणि संस्थानिक अधिकाऱ्यांनी मिळून आपापल्या निकटवर्तीयांना स्वच्छतेचे ठेके मिळवून दिले आहेत. स्वच्छतेचे काम जागेवर नव्हे तर कागदावरच दिसते. जवळपास सर्वच स्वच्छतागृहांमध्ये घाणीचे साम्राज्य कायम असल्याने लाखो रुपये खर्च व्यर्थ गेल्याचे दिसते.

यांत्रिकी पद्धतीने आणि पुरेसा पाण्याचा दाब वापरून चांगल्या प्रकारे स्वच्छतेचे काम केले जाते. तरीही स्वच्छतागृहांमध्ये मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता दिसून येते. महिला शौचालयांमध्येही अस्वच्छता आढळून येते. त्यावर प्रबोधन हा महत्त्वाचा उपाय आहे. स्वच्छतागृहे आपल्यासाठीच आहेत, याची जाणीव नागरिकांमध्ये असली पाहिजे.

– दिलीप गावडे,अतिरिक्त आयुक्त, पिंपरी पालिका

रात्रीत स्वच्छतागृहे गायब होतात तेव्हा..

पिंपरी-चिंचवड शहराच्या अनेक भागातून स्वच्छतागृहे गायब झालेली आहेत. बांधकाम व्यावसायिक, लोकप्रतिनिधी, पालिका अधिकारी अशा घटकांनी रात्रीत स्वच्छतागृहे गायब करण्याची किमया केली आहे. विशेषत: पिंपरी बाजारपेठेत हा प्रकार सातत्याने होत आला असल्याचे सांगण्यात येते.