धोका कमी करण्यासाठी स्वतंत्र आराखडा

किनारपट्टीलगतच्या विभागांमध्ये संभाव्य चक्रीवादळाचा धोका कमी करण्यासाठी स्वतंत्रपणे आपत्ती निवारण आराखडा तयार करण्यात आला आहे. तेथील आपत्ती निवारणाच्या उपाययोजनांसाठी ३९७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असून, किनारपट्टीलगतच्या सहा जिल्ह्य़ांपासून या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख सुभाष दिवसे यांनी दिली.

दिवसे म्हणाले, की किनारपट्टीलगतच्या विभागांमधील आपत्ती व्यवस्थापनासाठी जागतिक बँक व केंद्र शासनाकडूनही निधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रामध्ये कोकण भागातून या प्रकल्पाला सुरुवात करण्यात येणार आहे. चक्रीवादळात समुद्राचे खारे पाणी शेतांमध्ये शिरून नुकसान होते. ते टाळण्यासाठी ५० किलोमीटर लांबीची भिंत बांधणे, आपत्तीच्या काळात नागरिकांना स्थलांतरित करणे व त्यांच्या निवासाची व्यवस्था करणे, आपत्तीला तोंड देण्यासाठी नागरिकांना प्रशिक्षित करणे, आपत्तीचा इशारा देणारी प्रभावी यंत्रणा विकसित करणे आदी कामे या योजनेमध्ये करण्यात येणार आहेत. चक्रीवादळात प्रामुख्याने विजेच्या यंत्रणेवर परिणाम होतो. विजेचे खांब व तारा तुटतात. त्यामुळे या भागातील संपूर्ण वीजयंत्रणा भूमिगत करण्यावर भर देण्यात येणार आहे.

प्रकल्पाचा पहिला टप्पा पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ातील किनारपट्टीवरून सुरू करण्यात येईल. नंतरच्या टप्प्यामध्ये इतर १४ जिल्ह्य़ांमध्ये काम करण्यात येईल. याशिवाय एक लाखापेक्षा जास्त लोकांची गर्दी होणाऱ्या यात्रा तसेच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी आपत्ती निवारण आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या शिर्डी येथेही आपत्ती निवारण आराखडा तयार करण्यात येत असल्याचे दिवसे यांनी सांगितले.