ऑगस्टपासून शहरातील डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये ही संख्या आणखी वाढल्याचे दिसून येत आहे. ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत ४५ जणांना डेंग्यू झाला असून दिवसाला सरासरी चारहून अधिक जणांना डेंग्यूची लागण होत असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
सप्टेंबरमध्ये पावसाने धरलेला जोर आणि पाऊस ओसरल्यानंतर महिन्याच्या शेवटापासून सुरू झालेला उकाडा डासांच्या पैदाशीसाठी चांगलाच पोषक ठरला आहे. ऑक्टोबरमध्ये दुपारी कडक ऊन तर रात्री चक्क थंडी असे तापमानातील चढउतार वाढले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात ३९३ जणांना डेंग्यू झाला आहे. यांतील निम्मे रुग्ण तर केवळ सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येच सापडले आहेत. ऑगस्टमध्ये १०४ जणांना डेंग्यू झाला होता, सप्टेंबरमध्ये ही संख्या १५७ झाली.
डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या किंवा साठलेल्या स्वच्छ पाण्यात होत असल्यामुळे पाणी साठून डासांची पैदास झालेली आढळल्यास संबंधितांवर खटले भरण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत एकूण वीस ठिकाणी खटले भरले गेले असल्याची माहिती महापालिकेच्या कीटकजन्य आजार नियंत्रण विभागाच्या प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी दिली. खटले भरण्यात आलेल्या व्यक्ती किंवा संस्थांवर न्यायालयीन कारवाई झाल्यानंतर त्या दंडास पात्र ठरू शकतील, असे त्या म्हणाल्या. मोहिमेअंतर्गत सप्टेंबरमध्ये ३ तर ऑक्टोबरमध्ये ९ खटले भरण्यात आले आहेत. यात सहकारनगर, नवी पेठ, सदाशिव पेठ, महम्मदवाडी, हडपसर, माळवाडी, पर्वती आणि सातारा रस्ता परिसरात ठिकठिकाणी डासांची उत्पत्ती आढळली आहे. यात प्रामुख्याने पाण्याची टाकी, सांडपाणी व्यवस्था, लिफ्टचे डक्ट, कारंजे, तळघर, फुटक्या बाटल्या आणि टायरसारखा कचरा अशा ठिकाणी डास जोमाने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.         

डेंग्यूची लक्षणे-
– २ ते ७ दिवस तीव्र स्वरूपाचा ताप
– डोकेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी
– अंगावर पुरळ उठणे
– अंतत्र्वचा किंवा नाकातोंडातून रक्तस्राव
– त्वचा थंड, निस्तेज होणे
– रक्तदाब कमी होणे
– प्लेटलेट काऊंट कमी होणे