News Flash

स्पर्धा परीक्षार्थींमध्ये अस्वस्थता

अभ्यासिका बंद असल्याने अभ्यासाला कमी वेळ

(संग्रहित छायाचित्र)

संसर्गाची भीती, जेवण्याच्या अडचणी, परीक्षेचे दडपण; अभ्यासिका बंद असल्याने अभ्यासाला कमी वेळ

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अभ्यासिका बंद होत असल्याने अभ्यासाला मिळणारा कमी वेळ, खाण्या-पिण्याच्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ एप्रिलला राज्यभरातील विविध केंद्रांवर होणार आहे. या परीक्षेची तयारी करणारे बरेच परीक्षार्थी पुण्यात राहत आहेत. गेल्या काही दिवसांत काही परीक्षार्थींना करोनाची लागण झाली आहे. तर दोन तरुणांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. अनेक विद्यार्थी पुण्यात एकत्र राहत असल्याने त्यांना संसर्ग होण्याची भीती वाटू लागली आहे. त्याशिवाय संध्याकाळी सहानंतर जेवणाचे पार्सलही मिळत नसल्याने खाण्या-पिण्याची अडचण होऊ लागल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

प्रवीण दंडगुले म्हणाला, की सायंकाळी सहानंतर संचारबंदी असल्याने अभ्यासिका बंद होत असल्याने अभ्यासाला वेळ कमी पडते. खाणावळीतून पार्सलही मिळत नसल्याने खाण्या-पिण्याच्या अडचणी आहेत. तसेच वाढत्या संसर्गाचीही भीती आहे. त्यामुळे एकूणच मानसिक दडपण येते आहे.

गेल्या काही दिवसांत संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. काही विद्यार्थ्यांनाही संसर्ग झाला आहे. या परीक्षेमुळे अनेक विद्यार्थी पुण्यातून राज्यभरातील जिल्ह््यांमध्ये जाणार आहेत. त्यामुळे एकूण परिस्थिती पाहता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महिनाभर परीक्षा पुढे ढकलून नवीन तारीख जाहीर करावी. राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यावरून आंदोलन झाले, तेव्हाची आणि सध्याची संसर्गाची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे परीक्षार्थी अस्वस्थ आहेत, असे गणेश डोंगरे या विद्यार्थ्याने सांगितले.

राज्यभरात जिल्ह््याच्या ठिकाणी ११ एप्रिलला परीक्षा होणार आहे. करोनाची लागण झालेले विद्यार्थी कसे परीक्षा देणार हाही प्रश्न आहे. ही परीक्षा देता न आल्यास संधी गमावली जाणार आहे, असे हनुमान हांगे म्हणाला.

११ एप्रिलची दुय्यम सेवा परीक्षा ठरलेल्या नियोजनानुसार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे  (एमपीएससी) ११ एप्रिलला होणारी दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहे. राज्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने प्रतिबंधात्मक निर्बंधांमध्ये वाढ के ली आहे. त्यात सायंकाळी सहा ते सकाळी सात या वेळेत संचारबंदी, शनिवार-रविवारी पूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली. दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ एप्रिलला, रविवारीच होणार असल्याने टाळेबंदीच्या काळात परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर कसे पोहोचणार असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यामुळे ११ एप्रिलची परीक्षा नियोजनानुसार होणार नाही याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. मात्र राज्य शासनाने सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार परीक्षार्थींना टाळेबंदीतून सूट देण्यात आली आहे. परीक्षार्थींना त्यांच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावर प्रवास करण्यास मुभा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाच्या नियोजित वेळापत्रकानुसार ११ एप्रिलची दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा होणार असल्याची माहिती आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी दिली.

‘संचारबंदीमुळे उपाशी राहण्याची वेळ’

पुणे : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंधांच्या नावाखाली लागू केलेल्या टाळेबंदीमुळे  शहरात एकटे राहणारे नोकरदार, विद्यार्थी यांची प्रचंड अडचण होत आहे. नियमावलीनुसार सायंकाळी सहानंतर संचारबंदी आणि पार्सल सुविधेलाही बंदी करण्यात आल्याने रात्रीचे जेवण सायंकाळी सहाच्या आत न मिळाल्यास उपाशी राहण्याची वेळ नोकरदार, विद्यार्थ्यांवर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे  ११ एप्रिलला दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे. या परीक्षेच्या तयारीसाठी स्पर्धा परीक्षांचे अनेक विद्यार्थी पुण्यात राहत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2021 12:23 am

Web Title: discomfort among competition examinees abn 97
Next Stories
1 १२१ वर्षांत तिसऱ्यांदा मार्च तापलेला!
2 निर्बंधांच्या नावाखाली अघोषित टाळेबंदी
3 कुटुंबे बाधित झाल्यावर गृह विलगीकरण कसे?
Just Now!
X