14 October 2019

News Flash

शिक्षक भरती प्रक्रियेबाबत समाजमाध्यमांमध्ये असंतोष

राज्यातील बहुचर्चित शिक्षक भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांकडून समाजमाध्यमांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे

(संग्रहित छायाचित्र)

मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांवर टीका

राज्यातील बहुचर्चित शिक्षक भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांकडून समाजमाध्यमांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे. ट्विटरवर शिक्षक भरती असे स्वतंत्र हँडल कार्यरत असून, ‘शिक्षकभरती   फसवणूक’, ‘शिक्षकभरती २४०००’, ‘शिक्षकभरती पैसा जिंकला गुणवत्ता हरली’ असे हॅशटॅग मोठय़ा प्रमाणात वापरले जात आहेत. त्यात मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना लक्ष्य करण्यात आले आहे.

राज्य सरकारने गुरुवारी शिक्षक भरती प्रक्रियेबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला. त्यात न्यायालयाच्या आदेशानुसार खासगी संस्थांतील शिक्षक भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारेच होणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रक्रियेत एका जागेसाठी दहा उमेदवारांच्या मुलाखती होणार असून, या प्रक्रियेत राज्य सरकार किंवा खासगी व्यक्तीला हस्तक्षेप करता येणार नसल्याचेही शासन निर्णयात नमूद केले आहे. त्यामुळे पवित्र प्रणालीद्वारे पारदर्शक पद्धतीने शिक्षक भरती प्रक्रिया न होता भ्रष्टाचार होऊन ती अपवित्रच राहणार का, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्याशिवाय सद्यस्थितीत अनेक जिल्ह्य़ांतील बिंदुनामावली प्रक्रिया, आंतरजिल्ह बदल्या, आरक्षण अशा तांत्रिक बाजूंची पूर्तता झालेली नसल्याने भरती प्रक्रियेत नेमक्या किती जागा भरल्या जाणार हेही स्पष्ट झालेले नाही. सुरुवातीला सरकारकडून २४ हजार जागा भरल्या जाणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता १२ हजार जागाच भरल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर ट्विटर सारख्या समाजमाध्यमांमध्ये शिक्षकभरतीच्या मुद्दय़ावरून मोठी चर्चा सुरू असून, प्रक्रियेबाबत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिक्षक भरतीचा मुद्दा ट्विटरवर ‘ट्रेंडिग’मध्ये आहे. ‘शिक्षक भरती’ असे स्वतंत्र हँडल कार्यरत असून, ‘शिक्षकभरती   फसवणूक’, ‘शिक्षकभरती   २४०००’, ‘शिक्षकभरती   पैसा   जिंकला   गुणवत्ता   हरली’, ‘संस्थाचालकांची   मनमानी’ अशा हॅशटॅगचा मोठय़ा प्रमाणात वापर होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लक्ष्य करून ट्विट केली जात आहेत. त्यात तावडे यांनी केलेल्या घोषणांचे दाखलेही दिले जात आहेत. सरकारने उमेदवारांच्या जखमेवर मीठ चोळले, सरकारने पात्रताधारकांची फसवणूक केली, अभियोग्यता धारकांचे काय अशा आशयाची अनेक ट्विट उमेदवार आणि शिक्षक भरती उपोषणकर्त्यांकडूनही करण्यात आली आहेत.

First Published on February 10, 2019 1:15 am

Web Title: discontent in the social media about recruitment process teacher recruitment