01 March 2021

News Flash

मुद्रांक शुल्क कपातीनंतरही ग्राहक घरखरेदीस अनुत्सुक

गेल्या वर्षीच्या तुलनेत दस्तनोंदणी निम्म्यावर

(संग्रहित छायाचित्र)

करोना टाळेबंदीमुळे घरखरेदीस ग्राहक अनुत्सुक असल्याने राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात घसघशीत कपात केली. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत दसऱ्याच्या महिन्यातील घरखरेदीत यंदा जवळपास निम्मी घट झाली. दसऱ्याच्या दिवशी यंदा पुणे, ठाणे, नाशिक येथील नोंदणी कार्यालये सुरू ठेवल्यानंतर केवळ ८६२ दस्तांची नोंदणी झाली.

दसऱ्याच्या मुहूर्तावर जमीन, घर खरेदीला नागरिकांकडून प्राधान्य दिले जाते. हा मुहूर्त साधण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून पुणे, ठाणे आणि नाशिकमधील निवडक दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती. मात्र, या तिन्ही शहरांत मिळून केवळ पाच कोटी रुपयांचा महसूल विभागाला प्राप्त झाला. करोनामुळे बाजारात मंदी असल्याने यंदा जमीन, घर, सदनिका खरेदी-विक्री व्यवहारांसाठी नागरिकांनी आखडता हात घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शासनाला ५८११ दस्त नोंदणीतून तब्बल ४४२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. यंदा दसऱ्याच्या दिवसापर्यंत महिनाभरात केवळ साडेतीन हजारांच्या आसपास दस्त नोंदणी होऊन ११५ कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत जमा होऊ शकले आहेत.

राज्यभरात ५०७ दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. त्यामुळे जमीन, घर आणि सदनिका खरेदी-विक्रीसाठी मुहूर्त म्हणून दसऱ्याला पसंती दिली जाते. त्यामुळे काही निवडक दुय्यम निबंधक कार्यालये सुट्टी असूनही सुरू ठेवण्याबाबत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. राज्यातील सर्व दुय्यम निबंधकांशी चर्चा करून पुणे, ठाणे आणि नाशिक शहरांमधील निवडक कार्यालये रविवारी (२५ ऑक्टोबर) सुरू ठेवण्याचे आदेश राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक ओमप्रकाश देशमुख यांनी दिले होते. त्यानुसार पुणे, ठाणे, नाशिक या तिन्ही जिल्ह्य़ांमध्ये मिळून ८६२ दस्त नोंद होऊन पाच कोटी सात लाख रुपयांचा महसूल विभागाला प्राप्त झाला आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ४४२ कोटी रुपयांचा महसूल विभागाला प्राप्त झाला होता. यंदा ऑक्टोबर महिन्यात सोमवापर्यंत (२६ ऑक्टोबर) ११५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

सर्वाधिक नोंदणी पुण्यात

पुणे शहरातील पाच दुय्यम निबंधक कार्यालये दसऱ्याच्या दिवशी सुरू होती. या कार्यालयांमध्ये रविवारी ५७६ दस्त नोंद होऊन २.९५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. नाशिकमध्ये एकच कार्यालय सुरू होते.

तिथे २० दस्त नोंद होऊन २५.११ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला. तर, ठाणे शहर आणि ग्रामीण मिळून पाच, तर रायगड जिल्ह्य़ात एक अशी सहा कार्यालये सुरू होती.

याठिकाणी २६६ दस्त नोंद होऊन एक कोटी ८६ लाख ८९ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 12:01 am

Web Title: discouraged from buying a house during the dussehra period against the backdrop of corona abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुण्यात करोनाचे १४७ नवे रुग्ण, पिंपरीत पाच जणांचा मृत्यू
2 हॉटेलमध्ये शिवसेनेच्या माजी शहर प्रमुखाची गोळया झाडून हत्या, लोणावळयातील घटना
3 पुणेकरांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं; झोप नाही, प्रोडक्टिव्हीटी पाहा!
Just Now!
X