पुण्याला बसू लागलेला दुपारच्या उन्हाचा तडाखा, गेले काही दिवस ढगाळ राहणारे हवामान आणि त्याबरोबरच सुरू असलेली पाणीटंचाई यांचा परिणाम आजारांवरही दिसत आहे. डासांमुळे पसरणारे आजार सध्या कमी झाले असले, तरी पोट बिघडणे व काविळीसारख्या आजारांचे रुग्ण सापडतच आहेत.
फेब्रुवारीच्या मध्यापासूनच पुण्यात दुपारचे ऊन तापण्यास सुरुवात झाली होती. रात्री व पहाटे थंडी आणि दुपारी कडक ऊन अशा वातावरणात हवा ढगाळ राहण्यासही सुरुवात झाली होती. मार्चमध्येही ढगाळ वातावरण कायम राहिले परंतु त्याच वेळी दुपारी चांगलेच ऊन जाणवू लागले. या उन्हाचा एक परिणाम म्हणून डासांद्वारे पसरणारे आजार मार्चमध्ये लक्षणीय रीत्या कमी झाल्याचे दिसत आहे.
पालिकेच्या आकडेवारीनुसार पुण्यात वर्षभर आढळणाऱ्या डेंगूसदृश तापाचे ६२ रुग्ण शहरात जानेवारीत सापडले होते, तर डेंग्यूरुग्ण म्हणून २७ जणांची नोंद झाली होती. फेब्रुवारीत ही संख्या थोडी कमी झाली आणि ३० डेंग्यूसदृश रुग्ण व ८ डेंग्यू तापाचे रुग्ण या महिन्यात आढळले. या तापाचा प्रादुर्भाव मार्चमध्ये आणखी कमी झाला व ३ डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळले, तर केवळ एकाच डेंग्यूरुग्णाची नोंद झाली. या वर्षी पहिल्याच महिन्यात पुण्यात चिकुनगुनियाचे ६८ रुग्ण सापडले होते व चिकुनगुनियाची साथ सुरू होणार की काय, अशी भीती निर्माण झाली होती. परंतु फेब्रुवारीत चिकुनगुनियाचे १८ रुग्ण आढळले, तर मार्चमध्ये अद्याप एकाही चिकुनगुनिया रुग्णाची नोंद झालेली नाही. मलेरियाचेही या वर्षी केवळ जानेवारीत ३ रुग्ण सापडले आहेत.
डासांवाटे पसरणारे आजार हळूहळू कमी होत असताना पोट बिघडणे व हगवणीसारख्या (अक्यूट डायरियल डिसिज) आजारांचे रुग्ण अजूनही सापडत आहेत. या आजाराचे ६५ रुग्ण या वर्षी सापडले असून त्यातील १६ रुग्ण मार्च महिन्यात आढळले आहेत. विषाणूजन्य काविळीचेही ६९ रुग्ण जानेवारीपासून सापडले. त्यातील १० रुग्ण चालू महिन्यात सापडले आहेत.