03 April 2020

News Flash

दिशा डायरेक्टकडून फसवणूक झाल्याची गुंतवणूकदारांची तक्रार

रायगड जिल्ह्य़ातील रखडलेला प्रकल्प चार-पाच महिन्यांत पूर्ण करण्याची कंपनीची ग्वाही

‘दिशा डायरेक्ट’ या संस्थेच्या वतीने रायगड जिल्ह्य़ातील कुडली गावात विकण्यात आलेल्या जागेवर सध्या फक्त झुडपांचे राज्य आहे.

रायगड जिल्ह्य़ातील रखडलेला प्रकल्प चार-पाच महिन्यांत पूर्ण करण्याची कंपनीची ग्वाही

गुंतवणूक आणि दुसऱ्या घराचे स्वप्न अशी सांगड घालत कोकणात आपल्या नावावर जमीन झाली खरी, पण रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत सुविधा पाच वर्षांनतंरही न मिळाल्याने ‘दिशा डायरेक्ट’ या कंपनीच्या प्लॉटधारकांच्या स्वप्नांवर अक्षरश: निराशेचे ढग जमा झाले आहेत. ‘दिशा डायरेक्ट’ तर्फे रायगड जिल्ह्य़ातील कुडली गावात विकण्यात आलेल्या या जागेवर सध्या फक्त झुडपांचे राज्य आहे. गुंतवलेल्या पैशाचा कोणत्याही प्रकारचा परतावा न मिळाल्याने या गुंतवणूकदारांनी आंदोलनाचा पवित्रा घेण्याचे ठरवले आहे.
‘दिशा डायरेक्ट’ने २००९-२०१० या कालावधीत ताम्हिणी घाटाच्या खाली रोह्य़ाजवळील कुडली या गावात ‘लँडमार्क मेडोज’ हा प्रकल्प जाहीर केला. एक, दोन व तीन गुंठय़ांचे प्लॉट त्या ठिकाणी तयार करण्यात आले. विविध माध्यमांतून भरपूर प्रसिद्धी केल्यामुळे या प्रकल्पात सुमारे २५० जणांनी गुंतवणूकही केली.
प्लॉटच्याच किमतीमध्ये वीजजोडणी, पाण्याची व्यवस्था, अंतर्गत व मुख्य रस्ता, बाग, खेळाचे मैदान व चोवीस तास सुरक्षा व्यवस्था देण्यात येईल, असे आश्वासन त्या वेळी देण्यात आले होते. मात्र, सहा वर्षे उलटून गेल्यानंतरही त्यातील एकही सुविधा पुरवण्यात आली नसल्याची ग्राहकांची तक्रार आहे. यासंदर्भात या प्लॉटधारकांनी वेळोवेळी कंपनीचे उंबरे झिजवले, पण केवळ आश्वासनांशिवाय त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. सद्यस्थितीत सर्वच प्लॉट पडीक अवस्थेत असून, त्याची पुरती दुर्दशा झाल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदार हताश झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर सर्व गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन हे प्रकण धसास लावण्याचे ठरवले आहे. त्यासाठी वृत्तपत्रांत जाहिरात देऊन अशा ग्रस्त प्लॉटधारकांना एकत्र येण्याचे आवाहनही करण्यात आले. ‘लोकसत्ता’कडे या संदर्भात त्यांनी कागदपत्रांनिशी तक्रार मांडली, एवढेच नव्हे, तर संबंधित प्रतिनिधीला प्रकल्पस्थळावरील प्रत्यक्ष परिस्थितीही दाखवली.
या गुंतवणूकदारांच्या म्हणण्यानुसार जागा घेण्यापूर्वी प्रत्येकाला प्रकल्पापर्यंत नेण्यासाठी वाहनांची व्यवस्था होती. तेथे प्रत्येकाला मोठय़ा अदबीने वागणूक देत भोजनाचीही व्यवस्था करण्यात येत होती. मात्र, काही दिवसांनंतर हे चित्र पालटले.
कंपनीने जाहीर केलेल्या सुविधा देण्याची मागणी गुंतवणूकदारांकडून होऊ लागली. त्याबरोबर कंपनीने सर्व पैसे भरण्याची मागणी केली.
प्रकल्प एकमधील सर्वानी, तर प्रकल्प दोनमधील बहुतांश लोकांनी सर्व पैसे भरले व प्लॉटची खरेदीखतेही झाली. मात्र, सुविधा पुरविण्याबाबत कंपनीने पाठ फिरवली. प्रत्यक्ष भेटीत गोड बोलून सर्व सुविधा देण्याचे आश्वासन देताना कंपनीने कालावधीही निश्चित केला. मात्र कोणतीही कृती केली नाही. मोठी गुंतवणूक करून त्याचा कोणताही फायदा मिळत नसल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदार हतबल झाले आहेत. कंपनीकडून त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. सद्यस्थितीमध्ये प्रकल्पाची पुरती वाट लागली आहे. प्लॉटची कुंपणेही तुटण्याच्या अवस्थेत आहेत. जागेवर मोठय़ा प्रमाणावर गवत वाढले आहे. अंतर्गत रस्ते, सर्व प्लॉटला वीज, पाणी, सुरक्षा, मैदान, बाग आदींपैकी एकही काम तेथे होऊ शकलेले नाही. महाबळेश्वरजवळही कंपनीने अशाच प्रकारचा एक प्रकल्प राबविला असून, त्याचीही अवस्था दयनीय असल्याची गुंतवणूकदारांची तक्रार आहे.

ग्राहकांचे हित हेच धोरण – संतोष नाईक
दिशा डायरेक्ट मार्केटिंग सव्र्हिसेस प्रा. लिमिटेड गेल्या १२ वर्षांपासून रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीने अनेक मोठे प्रकल्प पूर्णत्वास नेले आहेत. नावीन्यपूर्ण प्रकल्प, दर्जेदार ग्राहकसेवा आणि विश्वास या त्रिसूत्रीच्या जोरावर हजारो ग्राहक समाधानी आहेत. ग्राहकांचे हित आणि समाधान हेच कंपनीचे े धोरण आहे. आम्ही हाती घेतलेले बहुतांश प्रकल्प वेळेआधी पूर्ण केले आहेत. रोह्य़ाजवळील संबंधित प्रकल्प ८५ ते ९० टक्के पूर्ण झाला असून, काही स्थानिक अडचणी, लागणाऱ्या मालाची कमतरता व तांत्रिक कारणामुळे प्रकल्पातील १० ते १५ टक्के काम अपूर्ण आहे. मी स्वत या कामाची देखरेख करत असून, ग्राहक प्रतिनिधींसोबत चर्चा करत आहे. हा प्रकल्प येत्या चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत पूर्णत्वास गेलेला असेल असे दिशा डायरेक्टचे व्यवस्थापकीय संचालक संतोष नाईक यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2016 4:43 am

Web Title: disha direct fraud with investors
Next Stories
1 मला कोणत्याही फंदात पडायचे नाही- अजित पवार
2 पाणीपट्टी वाढीच्या निर्णयासाठीची खास सभा अचानक तहकूब
3 मंदिरात चोरी करणारी आंतरराज्यीय चोरटय़ांची टोळी गजाआड
Just Now!
X