राज्यात करोना विषाणूचा फैलाव वाढतच असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातील केसनंद गावाला पूर्णपणे क्वारंटाइन करण्याचा निर्णय ग्रामपंचायतकडून घेण्यात आला आहे. दरम्यान, या गावात काल पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या अग्निशामन दलाकडून निर्जंतुकीकरण करण्यात आलं.

या गावात एकही करोनाग्रस्त रुग्ण आढळलेलाना नसतानाही गावाच्या सुरक्षेसाठी ग्रामपंचायतीनं स्वतःहूनच गाव क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, २४ मार्चपासून या गावातून कोणाही व्यक्तीला आपल्या घरातून बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच गावच्या हद्दीबाहेर कोणालाही जाऊ दिलं जात नाही तसेच बाहेरच्या कोणाही व्यक्तीला गावात प्रवेश बंद करण्यात आला आहे. केवळ अत्यावश्यक सेवांनाच यातून वगळण्यात आलं आहे.

दरम्यान, केसनंद गावामध्ये बुधवारी संध्याकाळी अग्निशमन दलातर्फे निर्जंतुकीकरण करण्यात आले. यामध्ये रस्ते, बंद असलेली दुकानं, सोसायट्या, झाडं, पार्किंगमधील गाड्या यांच्यावर जंतूंचा नाश करणाऱ्या औषधमिश्रीत पाण्याचे फवारे मारण्यात आले.