पक्षहितापेक्षा देशहिताला प्राधान्य देण्यामध्येच शदर पवार यांचे मोठेपण सामावले आहे. व्यक्तिगत मानापमानाचा विचारही कधी त्यांच्या मनात येत नाही. हेच त्यांना जाणता राजा संबोधिण्यामागचे गमक आहे, असे मत माजी केंद्रीय अर्थ सचिव विजय केळकर यांनी रविवारी व्यक्त केले.
शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ‘सुशासन आणि संवाद’ या पुस्तकाचे प्रकाशन विजय केळकर यांच्या हस्ते झाले. महापौर दत्तात्रय धनकवडे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष प्रतापराव पवार, प्रतिष्ठानचे संस्थापक लक्ष्मीकांत खाबिया आणि अध्यक्ष राहुल देशपाडे या वेळी उपस्थित होते. पवार यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये त्यांच्यासमवेत प्रशासनात आणि खासगी सचिवपदाची जबाबदारी पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लेखांचा या पुस्तकामध्ये समावेश आहे.
केळकर म्हणाले, केंद्रामध्ये अर्थ सचिव म्हणून १९९८ मध्ये मी जबाबदारी पार पाडत असताना पवार लोकसभेचे विरोधी पक्षनेते होते. अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी मांडलेला अर्थसंकल्प समजावून घेण्यासाठी पवार यांनी काँग्रेसच्या दोन-तीन खासदारांना माझ्याकडे पाठविले होते. या अर्थसंकल्पावर संसदेमध्ये चर्चा होण्याआधीच जयललिता यांच्या अण्णा द्रमुक पक्षाने पािठबा काढून घेतल्याने सरकार अल्पमतात गेले. मात्र, अर्थसंकल्प मंजूर करून घ्यावा आणि नंतर राष्ट्रपती राजवट लागू करुयात असे मी पवार यांना सुचविताच त्यांनी देशहित डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे सहकार्य दिले.
केंद्रीय कृषिमंत्री या नात्याने पवार हे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) अध्यक्ष होते. त्यांनी मला आणि डॉ. रघुनाथ माशेलकर यांना बोलावून घेतले. नव्या हरितक्रांतीसंदर्भात परिषदेचा आणि संशोधनाचा ढाचा सुधारावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. परिषदेच्या बैठकांना तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री उपस्थित राहात नसत. त्यांनी उपस्थित राहावे असे वाटत असेल तर, परिषदेचे अध्ययक्षपद पंतप्रधानांनी स्वीकारले पाहिजे, अशी सूचना आम्ही पवार यांना केली होती. त्या क्षणी मानापमानाचा विचार न करता त्यांनी आनंदाने ही सूचना मान्य करून हे पद पंतप्रधानांना देऊ केले. पंतप्रधान अध्यक्ष झाले तर, अर्थमंत्रीही येतील आणि मोठय़ा प्रमाणावर निधी उपलब्ध होऊन परिषदेचे कामकाज सुरळीत होईल, असे पवार यांनी सांगितले होते. देशहिताला प्राधान्य देणारे पवार एक ना एक दिवस पंतप्रधान होतील, अशी शुभेच्छा देतो, असेही केळकर यांनी सांगितले.
शरद पवार या व्यक्तीविषयी समजापेक्षाही गैरसमजच अधिक आहेत. ते दूर करण्याचे काम या पुस्तकाद्वारे होईल, असे प्रतापराव पवार यांनी सांगितले. खाबिया यांनी प्रास्ताविक केले. प्रणित कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.