पूरग्रस्त भागात तातडीने मोफत पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी दिले होते. त्यानुसार बालभारतीने सांगली आणि कोल्हापूरसह पूरग्रस्त पाच जिल्ह्यत बालभारतीने ३ लाख १० हजार पुस्तकांचे मोफत वाटप केले. मागणी आल्यास आणखी पुस्तकांचा पुरवठा करण्यात येणार आहे.

बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी ही माहिती दिली. महापुरात मोठय़ा प्रमाणात शालेय साहित्याचे नुकसान झाले होते. त्यात पाठय़पुस्तकांची संख्या अधिक होती. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी तातडीने पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आदेश शेलार यांनी दिले होते. १ कोटी ३४ लाख रुपयांची पुस्तके कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधदुर्ग या पाच जिल्ह्य़ांमध्ये वाटण्यात आली.

‘शालेय शिक्षण मंत्र्यांच्या आदेशानुसार अल्पावधीतच पुस्तकांच्या वितरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. बालभारतीच्या कोल्हापूर भांडारातील कर्मचाऱ्यांनी स्वत:ची घरे पाण्याखाली असतानाही तत्परतेने पुस्तकांचा पुरवठा केला. त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावरील हसू कायम राहिले याचे समाधान आहे,’ असेही गोसावी यांनी सांगितले.