पिंपरी महापालिकेच्या वतीने आर्थिक दुर्बल गटातील नागरिकांसाठी ‘घरकुल’ प्रकल्पाच्या माध्यमातून सदनिका उपलब्ध करून दिल्या जात असून आतापर्यंत पाच टप्प्यात जवळपास अडीच हजार नागरिकांना सदनिका उपलब्ध करून दिल्या आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी पालिकेच्या वतीने ‘घरकुल’ प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यानुसार १२ सोसायटय़ांच्या इमारतीमधील ५०४ लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते काढण्यात आली. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाटय़गृहात झालेल्या सोडतीच्या कार्यक्रमास आयुक्त राजीव जाधव, सहआयुक्त दिलीप गावडे, नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, विमल काळे, रमेश काळे आदी उपस्थित होते. यापूर्वी १७ डिसेंबर २०१३ ला ५०४, आठ जानेवारी २०१४ ला ५०४ आणि १२ फेब्रुवारीला ५४६, सात जुलैला ६७२ सदनिकांचे वाटप करण्यात आले आहे. चिंचवडच्या कार्यक्रमात महापौर धराडे म्हणाल्या की, लाभार्थ्यांना त्यांच्या कष्टातून हे घर मिळाले आहे, त्यांनी ते स्वत:साठी वापरावे. कोणालाही भाडय़ाने अथवा नातेवाईकांना देऊ नये. लाभार्थ्यांनी घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप गावडे यांनी केले. सूत्रसंचालन किशोर केदारी यांनी केले. मिनीनाथ दंडवते यांनी आभार मानले.