स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पोलिसांना दुचाकींचे वितरण

पुणे : शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली असून ती सोडवण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांना गस्त घालण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मंगळवारी ८० दुचाकी देण्यात आल्या.

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपरेरेशन लिमिटेडतर्फे मंगळवारी पोलीस आयुक्तालयात झालेल्या एका कार्यक्रमात या दुचाकी देण्यात आल्या. महापौर मुक्ता टिळक, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, स्मार्ट सिटी कॉपरेरेशनचे मुख्य कार्यकारी आधिकारी राजेंद्र जगताप, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, पृथ्वीराज सुतार, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, बजाज कंपनीचे विभागीय व्यवस्थापक गौरव श्रीवास्तव आदी या प्रसंगी उपस्थित होते.

डॉ. व्यंकटेशम म्हणाले, पुणेकरांच्या सुरक्षिततेला पोलिसांनी प्राध्यान्य दिले आहे. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी शहरातील प्रत्येक सिग्नलवर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) यंत्रणा बसविण्याची आवश्यकता आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यास मदत होईल.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या दुचाकी पोलिसांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. शहरातील वाहतुकीची समस्या आणि कोंडीमुळे सामान्यांना त्रासाला सामोरे जावे लागते. शहरातील प्रत्येक चौक  आणि रस्त्यांवरची समस्या वेगळी आहे, असे टिळक यांनी नमूद केले.

जगताप म्हणाले, शहरात सुधारणा घडविण्यासाठी नागरिकांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यात वाहतूक विषयक सुधारणांबाबतच्या सर्वाधिक सूचना होत्या. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतुकीची समस्या सोडविणे शक्य होईल. पुढील टप्प्यात आणखी ६० दुचाकी पोलिसांना देण्यात येणार आहेत.

स्मार्ट पोलीस ठाणे</strong>

औंध येथे स्मार्ट पोलीस ठाणे प्रस्तावित आहे. शहरातील महत्त्वाचे चौक पोलीस विरहित (कॉप फ्री) करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून चौकांमधील घडामोंडीवर लक्ष ठेवणे शक्य होईल. त्या माध्यमातून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे शक्य होईल. इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) यंत्रणा कारवाई तसेच कोंडी सोडविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी सांगितले.